विरार-डहाणू लोकल सुरू होऊन तीन वर्षे उलटली; ९ महिन्यांपूर्वी निविदा काढूनही कामाला सुरूवात नाही

चर्चगेट ते डहाणू रेल्वे लोकल सुरू होऊन तीन वर्षे उलटली तरी विरारपुढील एकाही स्थानकात अद्याप इंडिकेटर बसवण्यात आलेले नाहीत. रेल्वे प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. गाडी किती वाजता येणार, कोणत्या फलाटावर येणार, येण्यासाठी असलेला अवकाश अशी काहीच माहिती मिळत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. दरम्यान रेल्वे प्रवासी संघटनांनी याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे.

1878 summer special trains from Western Railway and 488 from Central Railway
पश्चिम रेल्वेवरून १,८७८ आणि मध्य रेल्वेवरून ४८८ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
Mega block on Sunday on Western Railway
मुंबई : पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
mumbai chembur to jacob circle monorail marathi news
स्वदेशी बनावटीच्या मोनोचे तीन डबे मुंबईत, उर्वरित नऊ मोनोरेल डिसेंबरपर्यंत ताफ्यात दाखल
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाडय़ा प्रथम चर्चगेटपासून विरापर्यंत धावत होत्या. पण रेल्वे प्रवासी व संघटनांच्या मागणीनंतर २०१३ नंतर या गाडय़ा डहाणूपर्यंत धावू लागल्या. यामुळे डहाणूपर्यंत लांब पल्ल्याच्या गाडय़ांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय झाली. विरारच्या पुढे वैतरणा ते डहाणू दरम्यान ९ स्थानके आहेत. लोकल सेवा सुरू होण्यापूर्वी २०१०मध्येच या स्थानकांवर इंडिकेटर लावण्यात आले होते. पण ते नादुरुस्त स्थितीत आहेत. या स्थानकांवरील फलाटांवर इंडिकेटर बसवावेत या मागणीसाठी रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते प्रथमेश प्रभोतेंडुलकर यांनी याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळी जुलै २०१६ मध्ये इंडिकेटर लावण्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत असे लेखी उत्तर देण्यात आले होते. परंतु २०१७ सालचा एप्रिल महिना उजाडूनही या स्थानकांवर इंडिकेटर लावण्यात आले नाहीत. निविदा काढून ९ महिने उलटूनही इंडिकेटर न लावण्यात आल्याने प्रभोतेंडुलकर यांनी रेल्वेच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी पुन्हा रेल्वेकडे याबाबत तक्रार केली असता आता रेल्वेने ३० जूनपर्यंत इंडिकेटर लावले जातील असे आश्वासन दिले आहे.

त्या दिखाऊ  इंडिकेटरचं काय झालं ?

चर्चगेट डहाणू लोकल २०१३ साली सुरू झाली मात्र २०१० सालीच या नऊ स्थानकांत इंडिकेटर लावण्यात आले होते होती. मुंबई रेल्वे विकास कोर्पोरेशनमार्फत ही इंडिकेटर लावण्यात आली होती. मात्र, हे इंडिकेटर कधी सुरु झालेच नाहीत. रेल्वेने हे इंडिकेटर दुरुस्त होणार नाहीत असे स्पष्टीकरण दिले आहे. हे इंडिकेटर बसवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले ते वाया गेले. याला जबाबदार कोण असा सवाल करत याबाबत चौकशी करण्याची मागणीडहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने केली आहे.

या स्थानकात अत्याधुनिक एलईडी तंत्रज्ञानाचे इंडिकेटर्स बसवायचे आहेत. निविदा काढून जर काम झाले नसेल तर नेमकी काय स्थिती आहे त्याची माहिती विभागाकडुन घेतली जाईल व कळवले जाईल.

-रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

स्थानकांवर इंडिकेटर नसणे म्हणजे रेल्वेचा आंधळा कारभार आहे. गाडय़ा उशीराने धावत असल्याने त्याची नीट माहिती मिळत नाही. निव्वळ अंदाजावर सगळी गणित जुळवावी लागतात. अनेकदा गोंधळ होतो व गाडय़ाही चुकतात.

-ओंकार बारी, प्रवासी

डहाणू, केळवे या स्थानकात पर्यटक येतात तसेच पालघर हे जिल्ह्य़ात मुख्यालय असल्याने दररोज हजारो नवीन प्रवासी येतात. इंडिकेटर नसल्याने त्यांना काहीच कळत नाही. ट्रेन कधी येणार, कुठल्या स्थानकात थांबणार, ती कुठून फास्ट होणार याची माहिती मिळत नाही. ही तर प्रवाशांची चेष्टाच आहे

– उमेश शेट्टी, प्रवासी

रेल्वेने दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. चार वर्षांत या स्थानकांवर जर रेल्वे इंडिकेटर लावत नसतील तर या मार्गाचे चौपदरीकरण कसे करणार?

-प्रथमेश प्रभोतेंडुलकर, रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते

गाडीच्या वेळासंदर्भात तसेच फलाटासंदर्भात वेळेत उद्घोषणा होत नाहीत. त्यात इंडिकेटर्सचा अभाव असल्याने यामुळे नेहमीच गैरसोय होते. रेल्वेने लवकरात लवकर इंडिकेटर बसविणे गरजेचे आहे.

-प्रियल पाटील, विद्यार्थीनी