जिल्ह्यात बुधवारी १,०३२ नवे रुग्ण आढळले. गेल्या चार महिन्यांतील ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे ३९२ रुग्ण कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळले. त्यामुळे या शहरांतील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा, तसेच शनिवार, रविवारी सम-विषम पद्धतीने दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने बुधवारी घेतला.

ठाणे जिल्ह््यात तीन ते चार महिन्यांपासून करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र होते. दररोज सरासरी ३५० ते ४०० रुग्ण आढळत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्ण वाढू लागले असून, रोज पाचशेच्या पुढे रुग्ण आढळून येत होते. बुधवारी जिल्ह्याात १ हजार ३२ रुग्ण आढळले. त्यात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३९२, ठाणे महापालिका क्षेत्रात २५६, नवी मुंबईत १५६, ठाणे ग्रामीण ५५, मिरा-भाईंदर ५३, बदलापूर ५१, उल्हासनगर ३०, अंबरनाथ २९ आणि भिवंडीतील १० रुग्णांचा सामावेश आहे. त्यामुळे जिल्ह््यातील करोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ७२ हजार १९३ इतकी झाली.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दररोज सरासरी दोनशेच्या आसपास तर ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज सरासरी दीडशे रुग्ण आढळून येत होते. मात्र, या दोन्ही शहरांतील रुग्ण संख्येत बुधवारी शंभरने वाढ झाली. त्यामुळे या दोन्ही शहरांची चिंता वाढली आहे. बुधवारी दिवसभरात ३९२ रुग्ण आढळून आल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली. करोना काळजी केंद्र, तेथील व्यवस्था सुसज्ज ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वैद्याकीय विभागाला दिले. ताप, सर्दी असलेल्या तसेच करोना संशयित रुग्णांना तात्काळ पालिकेच्या रुग्णालयात प्रतिजन चाचण्या करण्यासाठी पाठविण्याच्या सूचना त्यांनी खासगी डॉक्टर, रुग्णालय चालकांना दिल्या. रेल्वे, बस आगार प्रवेशद्वारांवर करोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय बुधवारच्या बैठकीत घेण्यात आला आहे. गुरुवारी महाशिवरात्रीमुळे शहरांतील ६५ शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, यासाठी मंदिरातील दर्शन बंद करण्यात आले आहे. तिथे मोजक्या पुजाºयांच्या उपस्थितीत सकाळी पूजापाठ होतील. मंदिरांमधील दर्शन सोहळे, जत्रा बंद करण्याचा निर्णय यापूर्वीच विश्वास्तांनी घेतला आहे, असे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.

कठोर निर्बंध लागू
कल्याण-डोंबिवली शहरात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, आयएमएचे पदाधिकारी आणि इतर आस्थापनांच्या मालकांशी तातडीची बैठक घेतली. त्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर निर्र्बंध लादण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार उपाहारगृह, स्वागतिका, मंगल कार्यालये सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, विवाह सोहळे, त्यामधील हळदीचे कार्यक्रम रात्री नऊ वाजेच्या आत उरकण्यात यावेत, असे नियम लागू करण्यात आले आहेत. हे कार्यक्रम करण्यापूर्वी प्रभाग अधिकारी, पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. पालिकेच्या आदेशाचे उल्लंघन करणाºया वधू-वर पिता, मंगल कार्यालय व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. घरपोच सेवा देणारी व्यवस्था रात्री १० वाजेपर्यंत काम करतील. अत्यावश्यक सेवेचे व्यवहार नियमित सुरू राहतील. मुखपट्टी वापरणे अनिवार्य आहे. करोना नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाºयांना करण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शाळा १५ मार्चपासून बंद
ठाणे : ठाणे जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ग्रामीण भागांतील शाळा १५ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. जिल्ह््यात २७ जानेवारीपासून शहरी भाग वगळून ग्रामीण भागांतील ५ वी ते १२ वीपर्यंत शाळा आणि महाविद्याालये जिल्हा प्रशासनाने सुरूकेली होती. मात्र, आता पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आणि तोपर्यंत ऑनलाइनद्वारे शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने शाळा व्यवस्थापनांना दिले.