सुंदराबाई को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ‘ह’ प्रभागसमोर, उमेशनगर, डोंबिवली (प.)

इमारतीचे मालक जर सहृदयी आणि संवेदनशील असतील, तर भाडेकरू किती समाधानाने राहू शकतात, याचे आदर्श उदाहरण म्हणजे डोंबिवलीतील सुंदराबाई को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. मालकाच्या इच्छेखातर त्यांच्या वंशजांनी भाडेकरूंना पुनर्विकासात सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे ही इमारत म्हणजे एक मोठे कुटुंब वाटते.

बामा भोईर अध्यात्मिक वाटेवरील एक सात्त्विक वारकरी. घरात नियमित पूजाअर्चा, देवधर्म. सुंदराबाई इमारतीच्या जमिनीचे हे मूळ मालक. आपल्या मृत्यूनंतर आपल्या मुलांनी सुखाने राहावे. जमीन मालकीवरून वाद करू नये म्हणून मूल लहान असताना बामा यांनी दूरदृष्टीचा विचार करून पत्नी सुंदराबाई (वय ८४) हिच्या सहकार्याने ‘इच्छापत्र’ (वील डीड) तयार केले. इच्छापत्रात त्यांनी ‘आपल्या जमिनीवरील चाळीत जे रहिवासी राहात आहेत त्यांचा या चाळीवर पूर्णपणे अधिकार असेल. त्या चाळीत जी आपली राहती खोली आहे ती एक खोली आपली असेल. उर्वरित सर्व मालकी हक्क भाडेकरूंचा असेल’ असे लिहून ठेवले. बामा यांच्या निधनानंतर मुलगा विजय, रवी यांच्या हाती बाबांच्या ठेवणीतील कागदपत्र लागली. त्यात ‘इच्छापत्र’ होते. भाडेकरू राहात असलेल्या इमारतीवर आपला पूर्ण हक्क नसेल हे मुलांना इच्छापत्रावरून कळले. आई-वडिलांच्या सात्विक संस्कारात, शिस्तीत वाढलेली, भाडेकरूंचे घर म्हणजे आपले दुसरे घर अशा वातावरणात वाढलेले भोईर बंधू वडिलांचा इच्छापत्रातील शब्द मोडायचा नाही. त्याचे पालन करायचे या निष्कर्षांप्रत आले. भाडेकरूंना या इच्छापत्राची कोणतीही कल्पना नव्हती. मात्र भोईर बंधूंनी ही बाब भाडेकरूंच्या निदर्शनास आणली. ‘वडिलांच्या आदेशाप्रमाणे वागा. त्यांचा शब्द पाडू नका. अनेक वर्षांचे शेजारी आपले भाडेकरू हे आपले एक कुटुंब आहे. त्यांना सांभाळणे हे एक कर्तव्य आहे’, असा सल्ला भोईर बंधूंच्या आई सुंदराबाईनी मुलांना दिला. तो त्यांनी पाळला. आईला सोसायटीत ‘ब’ म्हणजे मोठी आई (घरातील सर्वात ज्येष्ठ) म्हणून ओळखले जाते.

बच्चेकंपनी ते रहिवासी आजीला ‘ब’ म्हणून साद घालतात. आजी तेवढय़ाच तन्मयतेने त्यांना मायाळू भावाने प्रतिसाद देते. जमिनीचे मूळ मालक आपण असलो तरी त्यावर अधिकार भाडेकरूंचा हा निर्णय पक्का असल्याने भोईर बंधूंनी ‘मानीव अभिहस्तांतरण’ (डिम्ड कन्व्हेअन्स ) करून घेतले. चाळ तोडून तेथे इमारत बांधणीच्या हालचाली मालक-भाडेकरू यांच्या सहकार्याने सुरू झाल्या. जुनी चाळ जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी भोईर यांच्या ‘हितचिंतकांनी’ भाडेकरूंना ‘ते ‘भोईर’ आहेत. तुम्हाला ते बेघर करणार. तुम्हाला खोली मिळणार नाही’ म्हणून बिचकवण्याचा प्रयत्न केला. मात्र भाडेकरूंचा भोईर बंधूंवर पूर्ण विश्वास होता. थोडी अडचण आली. त्यावर मात करीत नवीन इमारत उभी राहिली. पालिकेच्या परवानग्या घेऊन ‘टेनेन्टेड एफएसआय’ वापरलेली सुंदराबाई निवास ही डोंबिवलीतील पहिली इमारत उभी राहिली. भाडेकरूंना हक्काची घरे मिळाली. नवीन इमारतीत मालक म्हणून एक निवासाची पूर्वपरंपार खोली भोईर बंधूंनी घेतली. उर्वरित सदनिका भाडेकरूंना मालकी हक्काने दिल्या. अनेकांना सदनिका खरेदीसाठी आर्थिक अडचण होती. ती भोईर बंधू, रहिवाशांनी आर्थिक सहकार्य करून दूर केली. काहींना दरमहा देखभाल खर्च मालकाला देणे परवडत नव्हते. त्याकडे भोईर बंधूंनी लक्ष दिले नाही.

सुविधांचा सुकाळ 

अध्यक्ष रवी भोईर, सचिव श्रीकांत तिरोडकर, कोषाध्यक्ष सूर्यकांत कडूलकर, विजय भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचा कारभार पाहिला जातो. इमारतीच्या तळ मजल्याला प्रशस्त वाहनतळ आहे. तिथे सदस्यांमधील कुणीही यावे, आपले वाहन उभे करावे असा नियम आहे. निवासासमोर राधाकृष्ण, साईबाबाचे मंदिर आहे. इमारतीच्या चोहोबाजूने फुलझाडे. देव्हाऱ्यातील कलशात कोंब आलेले पाच ते सहा नारळ इमारत परिसरात लावण्यात आले आहेत. ते चांगले रुजून त्याची झाडे झाली आहेत. कुपनलिकेचे पाणी सौरऊर्जेला जोडून रहिवाशांना गरम पाणी मिळेल अशी व्यवस्था आहे. पाणी उपशावर सोसायटीचे निर्बंध आहेत. कुपनलिकेभोवती जल पुनर्भरण करून पावसाचे पाणी कुपनलिकेत मुरवले जाते. सोसायटी परिसर स्वच्छ ठेवला जातो. चाळ संस्कृतीमुळे आजही घरांची दारे उघडी असतात.