पिसे बंधाऱ्याच्या दुरुस्तीमुळे आठवडाभर कमी दाबाने पुरवठा

ठाणे जिल्ह्य़ातील भातसा नदीच्या पिसे बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. या दुरुस्तीसाठी आणखी एक आठवडा लागणार आहे. त्यामुळे आणखी आठवडाभर शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. ऑक्टोबर सुरू झाल्याने शहरात उन्हाचा तडाखा जाणवू लागला असताना आता ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे राहिले आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील धरणांमधून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्य़ातील सर्वच धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे धरण क्षेत्रात मुबलक पाणी उपलब्ध आहे, तरीही बंधारा दुरुस्तीच्या कामामुळे ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे राहिले आहे. मुंबई आणि ठाणे महापालिका भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्याजवळून पाणी उचलून त्याचे शहरात वितरण करते. मुंबई महापालिका दररोज दोन हजार दशलक्ष लिटर तर ठाणे महापालिका स्वत:च्या योजनेसाठी दोनशे दशलक्ष लिटर पाणी घेते. ठाणे महापालिका विविध स्रोतांमार्फत ४८० दशलक्ष लिटर इतके पाणी घेऊन त्याचे शहरात वितरण करते. त्यामुळे महापालिकेच्या स्वत:च्या योजना हा शहरातील पाण्याचा महत्त्वाचा स्रोत म्हणून ओळखला जातो.

गेल्या आठ दिवसांपासून पिसे बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून त्यामुळे ठाणे महापालिकेला नदी पात्रातून पुरेसे पाणी उचलणे शक्य होत नाही. पावसाळ्यानंतर पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून दरवर्षी मुंबई महापालिकेकडून बंधाऱ्याच्या ‘बलून वॉल’ची दुरुस्ती करण्यात येते. याच वॉलच्या दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेने सुरू केले असून या कामासाठी आणखी आठ दिवस लागणार आहेत.

या दुरुस्तीच्या कामाचा फटका ठाणे शहरातील पाणीपुरवठय़ावर होऊ लागला असून यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. महापालिकेचे उपनगर अभियंता रवींद्र खडताळे यांनी गुरुवारी पिसे बंधाऱ्याजवळील दुरुस्ती कामाची पाहणी केली. पाहणीदरम्यान मुंबई महापालिकेच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता गोडबोले यांच्याकडून कामाचा आढावा घेऊन ते लवकरात लवकर करण्याची मागणी केली.

ठाणे महापालिका स्वत:च्या योजनेसाठी पिसे बंधाऱ्यातून दररोज दोनशे दशलक्ष लिटर पाणी उचलते. मात्र, दुरुस्ती कामामुळे सध्या १० ते १५ दशलक्ष लिटर कमी पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्याचा शहरातील पाणीपुरवठय़ावर परिणाम होऊन पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून येत्या आठ दिवसांत दुरुस्ती पूर्ण करण्याची विनंती मुंबई महापालिकेकडे केली आहे.

– रवींद्र खडताळे, उपनगर अभियंता, ठाणे महापालिका