पुरलेले मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवणी

ठाणे : वागळे इस्टेट भागातील रामनगर परिसरात सोमवारी सकाळी दोन वानरांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली. आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली असता या दोन्ही वानरांना अज्ञात मुलांनी जवळच्या डोंगरात पुरल्याची माहिती समोर आली. आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबत वन विभागाला कळवले असता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणाहून वानरांचे मृतदेह बाहेर काढले असून शव विच्छेदनासाठी ते बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवले आहेत. या वानरांची हत्या करण्यात आली की त्यांचा अपघाची मृत्यू झाला, याबाबत पुढील तपास सुरु असल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्यनगर या भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वानरांचा वावर वाढला आहे. हे वानर वीजेच्या खांबावर, वीज वाहिन्यांवर, झाडांवर उडय़ा मारत असून अनेकदा गृहसंकुलांमध्येही शिरत आहेत. अन्नाच्या शोधात वानरे घरामध्ये घुसत असल्यामुळे या भागांमध्ये वास्तवात असलेल्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अनेकदा विजेचा धक्का लागून वानरांना मृत्यू झाल्याचा घटना यापूर्वी घडल्या आहेत. असाच प्रकार सोमवारी पुन्हा समोर आला. वागळे इस्टेट परिसरातील रामनगर भागात मॅक्स स्पेर कंपनी समोर दोन वानरांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली होती. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता या दोन्ही वानरांना अज्ञात मुलांनी जवळच्या डोंगरात पुरल्याची माहिती स्थानिकांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन विभागाने या घटनेची माहिती तातडीने वन विभागाला दिली. वन विभागाने वानरांना पुरल्याच्या ठिकाणी धाव घेऊन मातीत पुरलेल्या त्या दोन्ही वानरांच्या मृतदेहांना बाहेर काढले. असून त्यांचे शव विच्छेदन करण्यासाठी बोरीवली येथील राष्ट्रीय उद्यानातील रुग्णालयात पाठवले.

वानरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या वानरांचे मृतदेह बाहेर काढले असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रूग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आलेले आहे. शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर या वानरांची हत्या आहे की अपघाती मृत्यू याची माहिती मिळू शकेल.

– नरेंद्र मुठे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ठाणे.