News Flash

मुबलक पाणी, तरीही  टँकरने पाणीपुरवठा

पाणीपुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

पालिकेकडून देयक उकळण्यासाठी टँकरचालकांची नवी शक्कल

मुसळधार पावसामुळे कल्याण, डोंबिवली शहराला मुबलक पाणीपुरवठा होत आहे. असे असतानाही महापालिकेचे काही खासगी टँकरचालक फे ऱ्यांचे केवळ देयक वसूल करण्यासाठी मुबलक पाणीसाठा असलेल्या सोसायटय़ांना दिवसातून एक ते दोन वेळ पाणीपुरवठा करीत आहेत. टँकरचालक मनमानी करून जलकुंभातील पाण्याचा उपसा करीत असल्याच्या तक्रारीही परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहेत. मात्र पाणीपुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

धरणात मुबलक पाणीसाठा नसल्यामुळे वर्षांच्या सुरुवातीला तीव्र पाणीटंचाईला कल्याण, डोंबिवलीतील रहिवाशांना सामोरे जावे लागले. मागील आठ महिन्यांपासून पाणीटंचाईचे चटके रहिवाशांनी सहन केले; परंतु आता पाऊस सातत्याने पडत असल्याने शहराला लागणारा पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वसाहतींमध्ये नियमित पाणीपुरवठा होत आहे. अशा परिस्थितीत पालिकेच्या जलकुंभांवरून पालिकेचे टँकरचालक बिनधास्तपणे पाण्याचे टँकर भरून वसाहतींमध्ये पाणीपुरवठा करीत आहेत. डोंबिवली पश्चिमेत जयहिंद कॉलनीमधील (उमेशनगर) जलकुंभावरून मोठय़ा प्रमाणात टँकरचालक पाणी उपसा करीत असल्याचा असाच एक प्रकार होत असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. काही टँकरचालक पालिकेकडून देयके उकळण्यासाठी हे प्रकार करीत असल्याचे सांगितले जात आहे.

या जलकुंभावरून ‘एमएक्सएल ६५००’ हा टँकर दररोज कोणत्या सोसायटीत किती फे ऱ्या मारतो याची माहिती आयुक्तांसह पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी काही जागरूक नागरिकांनी केली आहे. पालिकेचे नियुक्त केलेले टँकरचालक जलकुंभामधील पाण्याचा कसा बेसुमार उपसा करीत आहेत, याची तक्रार आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे करण्यात येणार आहे, असे या नागरिकांनी सांगितले. काही भागांमध्ये वर्चस्व असलेले काही पालिका पदाधिकारी, नगरसेवक आपणास पालिका निवडणुकीत एकगठ्ठा मते देणाऱ्या सोसायटय़ांना भरपूर पाणीपुरवठा व्हावा यासाठी टँकरचालकांना ‘हाताशी’ धरून त्यांच्या करवी पालिकेतून ३५० रुपयांच्या पावत्या न फाडता बिनबोभाट पाणीपुरवठा करीत आहेत, असे एका जागरूक रहिवाशाने सांगितले. यावर पाणीपुरवठा विभागाचे अजिबात लक्ष नाही. पालिकेने टँकरने पाणीपुरवठा करण्याची सुविधा अत्यावश्यक ठिकाणीच पुरवावी. सोसायटय़ा, अनधिकृत बांधकामांना पालिकेच्या टँकरचालकांकडून पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर पाळत ठेवण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात येणार आहे.

पालिकेच्या सेवेतील खासगी टँकरचालक नियमबाह्य़ पद्धतीने सोसायटींना पाणीपुरवठा करीत असतील तर ते चूक आहे. ज्या ठिकाणी खरेच पाणी टंचाईसदृश परिस्थिती आहे तेथेच टँकरचालकाने पाणी पुरवायचे आहे. वसाहतींमध्ये पाणी येत असेल तरीही तेथे टँकरद्वरे पाणीपुरवठा होत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. ‘ह’ प्रभागातील टँकरचालक हा प्रकार अधिक करीत असतील तर याबाबत प्रभागातील अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याच्या सूचना करण्यात येतील.

– राजीव पाठक,  कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 2:26 am

Web Title: tanker water supply in kalyan dombivali
Next Stories
1 अडथळ्यांच्या कोंडीत कल्याण पूर्वेतील स्कायवॉक रखडला
2 विद्यार्थ्यांची नियमबाह्य़ वाहतूक करणाऱ्या बसचालकांवर कारवाई
3 अनवाणी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पादत्राणांचे कुतूहल
Just Now!
X