ठाणे महापालिका क्षेत्रातील महिलांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा या उद्देशातून ‘टीएमटी’ प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी शहरातील विविध मार्गावर १० तेजस्विनी बसगाडय़ा सुरू केल्या आहेत. या बसगाडय़ा सकाळ आणि सायंकाळ या गर्दीच्या वेळेत केवळ महिलांसाठी तर दुपारच्या वेळेत सर्वासाठी चालविण्यात येत असून गेल्या दोन दिवसांमध्ये या बसगाडय़ाच्या वाहतुकीतून टीएमटी उपक्रमाला ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यामध्ये एकूण ३५३ बसगाडय़ा आहेत. त्यापैकी दररोज २८० बसगाडय़ा शहरातील विविध मार्गावर चालविण्यात येतात. त्यामध्ये वातानुकूलित २३ बसगाडय़ांचा समावेश आहे. उर्वरित ७३ बसगाडय़ा नादुरुस्त आहेत. शहरातील विविध मार्गावर चालविण्यात येणाऱ्या २८० बसगाडय़ांच्या प्रवासी वाहतुकीमधून परिवहनला दररोज २७ ते २८ लाखांचे उत्पन्न मिळते. त्यापैकी चार लाखांचे उत्पन्न वातानुकूलित बसगाडय़ांमधून मिळते. सद्य:स्थिती शहराच्या लोकसंख्येच्या मानाने टीएमटीच्या ताफ्यातील बसगाडय़ांची संख्या कमी आहे.
टीएमटीच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वी १० तेजस्विनी बसगाडय़ा दाखल झाल्या असून नाताळ सणाचे निमित्त साधून २५ डिसेंबरपासून या बसगाडय़ा शहरातील १० मार्गावर चालविण्यात येत आहेत.
त्यामध्ये ठाणे स्थानक पश्चिम ते वृदांवन सोसायटी, ठाणे स्थानक पश्चिम ते लोकमान्यनगर, ठाणे स्थानक पश्चिम ते वागळे आगार, ठाणे स्थानक पश्चिम ते गावंडबाग, ठाणे स्थानक पश्चिम ते पवारनगर, ठाणे स्थानक पश्चिम ते खारेगाव, ठाणे स्थानक पश्चिम ते कासारवडवली, ठाणे स्थानक पश्चिम ते धर्माचापाडा, ठाणे स्थानक पश्चिम ते दादलानीपार्क आणि ठाणे स्थानक पश्चिम ते कोलशेत या मार्गाचा समावेश आहे. या बसगाडय़ा सकाळ आणि सायंकाळ या गर्दीच्या वेळेत केवळ महिलांसाठी तर दुपारच्या वेळेत सर्वासाठी चालविण्यात येत आहेत.
दिवसाला १०७ फेऱ्या
१० तेजस्विनी बसच्या दिवसाला १०७ फेऱ्या होत आहेत. त्यापैकी सकाळ आणि सायंकाळी या गर्दीच्या वेळेत महिलांसाठी ६० फेऱ्या तर उर्वरित वेळेत सर्वासाठी ४७ फेऱ्या होत आहेत. या बसच्या प्रवासी वाहतुकीतून पहिल्याच दिवशी म्हणजेच २५ डिसेंबरला ३० हजारांचे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ डिसेंबरला ४० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती परिवहन प्रशासनाकडून देण्यात आली.