रिक्षा संघटना- वाहतूक अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर निर्णय
पर्यायी वाहनतळांची सुविधा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत इंदिरा चौकात रिक्षा वाहनतळांवर रिक्षा चालकांना व्यवसाय करण्यास वाहतूक विभागाने तात्पुरती परवानगी दिली आहे. या चौकातील तिन्ही बेकायदा वाहनतळांवर १० ते १५ रिक्षा चालकांना टप्प्याटप्प्याने व्यवसाय करता येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत हे वाहनतळ कायमस्वरूपी ठेवले जाणार नाहीत, असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
डोंबिवली पूर्व भागातील इंदिरा चौकात गांधीनगर, नांदिवली भागाकडे जाणाऱ्या रिक्षा गेल्या काही महिन्यांपासून उभ्या करण्यात येत होत्या. याच चौकातील मंजिरी साडी सेंटरसमोरून लोढा, काटई, मानपाडा भागात जाणाऱ्या रिक्षा, पनवेल बस थांब्याजवळून बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षा रस्त्यावर उभ्या असत. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गोळवली, सोनारपाडा, टाटा नाका भागात जाणाऱ्या रिक्षा उभ्या करण्यात येत आहेत. इंदिरा चौकातील या चारही बाजूने असलेल्या बेकायदा रिक्षा वाहनतळांमुळे चौकात सतत वाहतूक कोंडी होत होती. या चौकातून फडके रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्याकडून येणारी वाहने मानपाडा रस्त्याने पुढच्या प्रवासाला जात होती. त्यात रिक्षा वाहनतळ रिक्षांनी गजबजून गेलेले असल्याने या भागातून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना या चौकातून वाहन बाहेर काढणे मुश्कील होऊन बसत होते. या चौकात सतत वाहतूक कोंडी होत होती. प्रवाशांच्या याप्रकरणी तक्रारी वाढत होत्या.
या पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांपूर्वी वाहतूक कार्यालयात वाहतूक विभागाचे जयवंत नगराळे यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. इंदिरा चौकातील रिक्षा चालकांसाठी पर्यायी वाहनतळाची व्यवस्था होत नाही तोपर्यंत गांधीनगर, नांदिवली, लोढा, मानपाडा, गोळवली, सोनारपाडा भागात जाणाऱ्या रिक्षा वाहनतळांवर एका वेळी फक्त १० ते १५ रिक्षा दोन रांगांमध्ये उभ्या करण्यात येतील. पंधरा रिक्षा प्रवासी घेऊन निघून गेल्या की, मग अन्य रिक्षा चालकांनी या रांगेत येऊन उभे राहायचे. हे रिक्षाचालक प्रवासी घेऊन गेले की, त्यामागील रिक्षाचालकांनी वाहनतळावर यायचे, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.