साहित्याच्या वाचकांची इयत्ता वाढविण्यासाठी या वाचक कट्टय़ाची सुरूवात केली असून वाचकांना समृद्ध करण्यासाठी अशा उपक्रमांची प्रत्येक गावात व शहरात आवश्यकता आहे. असे मत ग्रंथसखा वाचनालयाचे संचालक श्याम जोशी यांनी व्यक्त केले. ते अक्षरसंध्या या वाचक कट्टय़ाच्या काटदरे सभागृहात झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
काका गोळे फाऊंडेशन व ग्रंथसखा वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या या अक्षरसंध्या वाचक कट्टय़ाच्या उद्घाटन सोहळ्यास काका गोळे फाऊंडेशनचे आशीष गोळे, ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी, उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील, उर्दूचे अभ्यासक रमेश अढांगळे, ‘झी-२४ तास’चे कार्यक्रम निर्माते संदीप साखरे, निवेदक भूषण करंदीकर व श्रीराम केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उर्दूचे अभ्यासक रमेश अढांगळे यांनी संकलित केलेल्या उर्दू गझलांच्या दहा खंडांचे प्रकाशन करण्यात आले.
जोशी पुढे म्हणाले की, वाचन करणाऱ्या प्रत्येकालाच त्याने वाचलेल्या साहित्यावर या वाचक कट्टयाच्या माध्यमातून आम्ही बोलते करणार आहोत. तसेच या कट्टय़ाच्या माध्यमातून वाचकांशी थेट संवादही साधण्यात येणार आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी बदलापूर पूर्वेकडील काका गोळे फाऊंडेशनच्या खुल्या व्यासपीठावर हा कार्यक्रम होणार असून येथे वाचकांनी वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्यात येणार असून प्रत्येक कार्यक्रमाच्या दिवशी एका साहित्यिकावर व त्यांच्या पुस्तकावर चर्चा करण्यात येणार आहे. या साहित्यिकाच्या छायाचित्रांचे व त्यांनी लेखन केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनही येथे मांडण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात चालू घडामोडींवर आधारित विषयावरही चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी ठरलेल्या विषयावर प्राधान्याने वाचकांची मते जाणून घेण्यात येणार आहेत.
येत्या १९ जुलै रोजीच्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात साहित्यिक व अभ्यासक नरहर कुरूंदकर यांच्या साहित्यावर चर्चा करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? याविषयावर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी पाच साहित्य प्रेमींनी व काका गोळे फाऊंडेशनचे आशिष गोळे यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. सुप्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर यांनी श्याम जोशी यांची मुलाखत घेतली. तर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर पाटील यांनी केले.