ऐरोली-काटई उन्नत मार्गासाठीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात

डोंबिवलीहून ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने दळणवळणासाठी पर्यायी मार्गाची उभारणी व्हावी यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या ऐरोली ते काटई या १२ किलोमीटर अंतराच्या महत्त्वाकांक्षी उन्नत मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाला लवकरच सुरुवात होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोलीपासून काटईच्या दिशेने पारसिकच्या डोंगररांगांपर्यंत उन्नत मार्गाच्या उभारणीसाठी विकास प्राधिकरणाने निविदा मागविल्या आहेत. पर्यावरण विभागाच्या पुढील मान्यतेनंतर टप्प्याटप्प्याने या मार्गाची उभारणी केली जाणार असून शीळ-कल्याण महामार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे चिंतातुर बनलेल्या बडय़ा बिल्डरांच्या गृहप्रकल्पांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

कल्याण-शीळ मार्गावर गेल्या काही वर्षांत शेकडोंच्या संख्येने नवी बांधकामे उभी राहत असून ठाणे-कल्याण-नवी मुंबई या त्रिकोणात सुरू असलेला हा विकास लक्षात घेता ठाणे महापालिका, रस्ते विकास महामंडळ, महानगर विकास प्राधिकरण तसेच सिडको प्राधिकरणांनी पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकल्पांची आखणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून एमएमआरडीएने ऐरोली काटई या मार्गाची आखणी केली आहे. ठाणे-बेलापूर मार्गालगत ऐरोली येथून सुरू होणाऱ्या या उन्नत मार्गाच्या पारसिक डोंगरापर्यंतच्या पहिल्या टप्प्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून सुमारे ४५० कोटी रुपयांचा खर्च या कामासाठी अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे मुख्य अभियंता प्रकाश ममदापुरे यांनी दिली.

नवी मुंबई ते डोंबिवली या प्रवासासाठी सद्य:स्थितीत महापेमार्गे शिळफाटा येथून डोंबिवली असा प्रवास करावा लागतो. बहुतांश ठाणेकर डोंबिवलीच्या दिशेने जाण्यासाठी मुंब्रा वळणरस्त्यामार्गे शिळफाटा येथे येतात आणि पुढे डोंबिवलीच्या दिशेने येजा करत असतात. या दोन्ही मार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका या पट्टय़ातील गृहप्रकल्पांतील घरांच्या विक्रीला बसू लागला आहे. त्यामुळे ऐरोली-काटई उन्नत मार्गाच्या कामास सुरुवात होताच, येथील घरांना चांगले दर आणि मागणी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ऐरोली ते काटई उन्नत मार्गासाठी पारसिक डोंगरांमधून सुमारे १.७ किलोमीटर अंतराचा बोगदा काढण्यात येणार असून सहा मार्गिकांच्या या मार्गात काही प्रमाणात खारफुटीचाही अडथळा येणार आहे. महानगर विकास प्राधिकरणाने यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. पर्यावरण विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत हा प्रकल्प असल्याने या प्रकल्पाची विभागणी तीन टप्प्यांत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

परिसरातील गृहविकासावर लक्ष

  • नवी मुंबईतील तळोजा ते काटईपर्यंत मेट्रोसारखा एखादा मोठा प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांनी यापूर्वीच मुंबई महानगर विकास प्राधिकरणापुढे ठेवला आहे.
  • रस्ते विकास महामंडळानेही कल्याण-शीळ मार्गावर उन्नत मार्गाची उभारणी करण्याचे ठरविले असून राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीच्या बैठकीत या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.
  • हा उन्नत मार्ग पुढे भिवंडीपर्यंत जोडण्यासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्याने रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाचा सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
  • कल्याण शीळ मार्गावरील लोढा बिल्डरला पलावा हा गृहप्रकल्प गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत राहिला आहे. याच भागात राज्य सरकारने २७ गावांच्या परिक्षेत्रात कल्याण विकास केंद्राची आखणी केली आहे.
  • ठाणे महापालिकेने आगासन ते शीळ खाडीवर पूल उभारणीसाठी १०० कोटी रुपयांचा प्रकल्प आखल्याने पलावा तसेच आसपासच्या उभ्या राहणाऱ्या गृहप्रकल्पांना त्याचा फायदाच होणार आहे.