शनिवारी(दि.13) सायंकाळपासून अचानक बेपत्ता झालेल्या १५ वर्षांच्या दोन विद्यार्थ्यांचा मृतदेह रविवारी कोपरीतील मिठागर खाडीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचा खाडीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज कोपरी पोलिसांनी वर्तविला आहे. ते दोघे बेपत्ता असल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभम विनोद देवकर आणि प्रवीण सत्यम कंचारी अशी त्यांची नावे आहेत. ते एकाच शाळेचे विद्यार्थी असून, बालपणीचे मित्र आहेत. कोपरीतील सुभाषनगरमध्ये राहणारे हे मित्र एकाच शाळेत नववी इयत्तेमध्ये शिक्षण घेत होते. शनिवारी दुपारपासून दोघेही अचानक बेपत्ता झाले होते. बराच वेळ झाला तरीही दोघे घरी न आल्याने पालकांनी कोपरी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला असता, रविवारी दुपारी मिठागर खाडीत दोन मुलांचे मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ अग्निशमन दलासह पोलिसांनी धाव घेत पाण्यातून मृतदेह बाहेर काढले. ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि कोपरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. हे मृतदेह शुभम आणि प्रवीण यांचेच असल्याचे स्पष्ट झाले.दोघांच्या अंगावर कोणत्याही जखमा किंवा व्रण आढळलेले नाहीत. मिठागर खाडीमध्ये पोहण्यासाठी आल्यानंतर मुलांना पाण्याचा अंदाज आला नसावा. त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. खाडीकिनारी त्यांचे कपडेही मिळाले आहेत. या मुलांना पोहता येत नव्हते. शिवाय, आपण कुठे चाललो आहे हेही त्यांनी घरी सांगितले नव्हते. खाडीत पोहण्यासाठी उतरलेल्या या मित्रांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.