अंतर्गत रस्त्यांवर पालिकेकडून विकासकामे; नियोजनाचा अभाव असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी
लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर महापालिकेकडून सुरू असलेल्या खोदकामांमुळे जागोजागी कोंडी होऊ लागली आहे. तलावपाळी, जांभळीनाका, कोपरी, ढोकाळी-मनोरमानगर, कामगार नाका, पाचपाखाडी या महत्त्वाच्या ठिकाणी दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळी मोठी वाहतूककोंडी होत आहे. या कोंडीत तासन्तास प्रवाशांना अडकून पडावे लागत आहे. ढोकाळी-मनोरमानगर मार्ग दोन्ही दिशेकडून खोदण्यात आला आहे. त्यामुळे येथील वाहनचालकांना वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. हे काम करताना पुरेसे नियोजन नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. सेवा रस्त्यांची अर्धवट कामे तसेच महामार्गालगत बेकायदा पद्धतीने उभी राहात असलेली वाहने यांमुळे दररोज सकाळ-संध्याकाळी घोडबंदर, नितीन कंपनी, तीन हात नाका परिसरात वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे बरेचसे प्रवासी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ये-जा करण्यासाठी अंतर्गत मार्गाचा वापर करत आहेत. असे असताना महापालिकेकडून तलावपाळी, जांभळीनाका, कोर्टनाका, कोपरी, यशोधन नगर, ढोकाळी-मनोरमानगर मार्ग, कामगार नाका, ज्ञानेश्वरनगर या भागांत रस्ते दुरुस्ती, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे या कामांसाठी महापालिकेने एकाच वेळी ठिकठिकाणी खोदकामे केले आहे. त्याचा परिणाम शहरातील अंतर्गत वाहतूककोंडीवर होऊ लागला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरभर कोंडी वाढली आहे. यासंदर्भात पालिकेच्या एका अभियंत्याशी संपर्क साधला असता, ही खोदकामे तात्काळ पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
खोदकामांमुळे कोणत्या ठिकाणी वाहतूक कोंडी?
कोर्टनाका, जांभळीनाका, तलावपाळी- या भागात चौकांचे काँक्रीटीकरण सुरू आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळी या मार्गावरून खासगी वाहनांसह टीएमटी, बसगाडय़ांचीही वर्दळ असते. तसेच हे रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे सकाळी आणि रात्री ये-जा करणाऱ्यांचे हाल होतात.
ज्ञानेश्वरनगर, कामगारनगर- ज्ञानेश्वरनगर येथे ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. तर कामगार नगर येथेही रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू आहे. वागळे इस्टेट येथून नितीन कंपनीच्या दिशेने येणारी वाहतूक एकेरी मार्गाने सुरू आहे. त्यामुळे यशोधन, अंबिकानगर, इंदिरानगर येथे वाहतूककोंडी होत असते. या ठिकाणी मोठय़ा कंपन्याही आहेत. वाहतूककोंडीमुळे या कंपन्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वेळेवर रिक्षा आणि बसगाडय़ाही उपलब्ध होत नाही.
मनोरमानगर-ढोकाळी मार्ग- मनोरमानगर आणि ढोकाळी या मार्गावरील दोन्ही दिशांकडे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे ढोकाळी आणि मनोरमानगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना आर मॉल मार्गे फेरा मारून ये-जा करावी लागत आहे. एकेरी मार्गिकाही उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कोपरी, पाचपाखाडी-कोपरी येथे स्थानक परिसरात पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे भर रस्त्यात खांब उभारले गेले आहेत. हा रस्ता अरुंद असताना त्यात या खांबांमुळे आता वाहतूककोंडी होत आहे. कोपरीत टीएमटी आणि बेस्टबसगाडय़ाही जात असतात. अरुंद रस्त्यामुळे कोपरीतील वाहनचालकांना अनेकदा १५ ते २० मिनिटे वाहतूककोंडी होत आहे. पाचपाखाडी येथेही खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे येथील वाहतूक एकेरी सुरू आहे. या मार्गावरून नितीन कंपनी तसेच हरिनिवास चौकात वाहनांची ये-जा सुरू असते.