खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कल्याणमधील हॉटेल व्यावसायिक भास्कर गंगाधर शेट्टी (४२) यांच्याकडे कुख्यात गुंड सुरेश पुजारी याने २५ लाख रुपये खंडणीची मागणी केली आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास घरात येऊन पत्नी, मुलांसमोर गोळ्या घालून ठार करीन अशी धमकी दिली आहे. मागील दोन दिवसांपासून वेगवेगळ्या भ्रमणध्वनींवरून भास्कर शेट्टी यांना खंडणीसाठी पुजारीकडून धमकावले जात आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भास्कर हे पत्नीसह कल्याणमधील गांधारे गाव येथे राहतात. त्यांना दोन मुले आहेत. पत्नी शिक्षिका आहे. मुंबईतील सेंट जॉर्ज दंत रुग्णालयातील छात्रालयाचे कॅन्टीन, आरोग्य भवन येथील कॅन्टीन ते चालवितात. मुलुंड चेकनाका येथील करतार सिंग व सुखविंदर कौर यांचे सिजर बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट ते मागील अनेक वर्षे भाडय़ाने चालवीत होते.कॅन्टीनचा कारभार पाहण्यासाठी भास्कर नेहमी मुंबईत जातात. दिवसभर पत्नी व मुले शाळेत असतात.

बुधवारी (८ नोव्हेंबर) दुपारी भास्कर शेट्टी यांच्या घराच्या बंद दरवाजातून एका अनोळखी व्यक्तीने एक पाकीट टाकले. संध्याकाळी पत्नी घरी आल्यानंतर त्यांनी ते पाकीट उघडल्यानंतर चिठ्ठीत ‘काय रे, माझे फोन का उचलत नाहीस. फोन उचल, नाही तर तुला पत्नी-मुलांसमोर गोळ्या घालून ठार मारीन’ असा सुरेश पुजारीची स्वाक्षरी असलेला धमकीचा मजकूर होता. पत्नीने तात्काळ पतीला हा विषय कळविला. त्यानंतर गुरुवार, शुक्रवार दोन दिवस भास्कर यांच्या भ्रमणध्वनीवर २५ लाखांची खंडणी मागण्यासाठी सुरेश पुजारीने संपर्क केला. सतत पुजारीचे भ्रमणध्वनी येऊ लागल्याने अस्वस्थ झालेल्या भास्कर यांनी सुरेश पुजारीविरुद्ध गुन्हा दाखल केला.