गुप्तधनाच्या आमीषाने साडेसोळा लाखांची फसवणूक
भिवंडी- गावामधील शेतात सोन्याची नाणी सापडली आहेत, ती साडे सोळा लाखांपर्यंत विकायची आहेत आणि त्या पैशातून गावात मशीद उभारण्याचे काम करायचे आहे, अशी बतावणी करत तीन भामटय़ांनी एका व्यक्तीला सुमारे साडे सोळा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार भिवंडीतील नालापार भागात घडला आहे. या तिघांपैकी एक भामटा भिवंडी येथील नालापार भागात जकेरीया मशीदमध्ये वर्गणी मागण्यासाठी गेला होता. तिथे त्याने एका ६५ वर्षीय व्यक्तीला दोन सोन्याची नाणी दाखवून अशा प्रकारची २३०० सोन्याची नाणी गावाकडील शेतात सापडली आहेत. ही सर्व नाणी १६ लाख ५० हजार रुपयांपर्यंत विकायची असून त्या पैशातून गावाकडे मशीद उभारायची आहे, असे बतावणी केली. त्यानंतर त्याने व त्याच्या दोन साथीदारांनी त्यांच्याकडून साडे सोळा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दिव्यात घरफोडी
मुंब्रा – दिवा येथील भगतवाडी भागातील एक घर फोडून चोरटय़ांनी सुमारे ६३ हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. घरातील मंडळी दादर येथे कार्यक्रमासाठी गेले होती. या संधीचा फायदा घेऊन चोरटय़ांनी डल्ला मारला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
मंगळसूत्राची चोरी
कल्याण- लोकग्राम परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरटय़ांनी खेचून नेल्याची घटना रविवारी पहाटे घडली. ही महिला आणि तिची मैत्रीण सकाळी फेरफटका मारत होती. त्यावेळी ही घटना घडली. २२ हजार ५०० रुपये किमतीचे  या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेला एक लाख रुपयांचा गंडा
भिवंडी- येथील गौरीपाडा भागात राहणाऱ्या एका महिलेला भामटय़ाने सुमारे एक लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून या महिलेच्या खात्यातील रक्कमेतून भामटय़ाने ऑनलाइनद्वारे खरेदी केल्याची बाब समोर आली आहे. अमित मिश्रा नावाच्या व्यक्तीने या महिलेस दूरध्वनी करून कुर्ला येथील एका खासगी बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. तसेच आधार कार्ड जमा केले नसल्यामुळे डेबिट कार्ड बंद होण्याची भीती दाखवून तिच्याकडून आधारकार्ड तसेच डेबिटकार्डचा क्रमांक घेतला. त्याआधारे त्याने महिनाभरात तिच्या बँकेच्या खात्यातील एक लाख रुपयांद्वारे ऑनलाइन खरेदी केली. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरटय़ांचा हल्ला
डोंबिवली- कल्याण पूर्वेतील नांदिवली भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला मारहाण करत चोरटय़ांनी त्याच्याकडील मोबाइल आणि रोख रक्कम असा ऐवज लुटून नेल्याचा प्रकार मंगळवारी घडला. ही व्यक्ती घरी जात असताना मोटारसायकलवरून तीन चोरटे आले आणि त्यांनी बेदम मारहाण केली.
४५ हजारांचा ऐवज लंपास
कल्याण- मोटारसायकलवरून प्रवास करीत असताना चोरटय़ांनी एका महिलेच्या गळ्यातील ४५ हजारांचे दागिने चोरल्याची घटना घडली आहे. रायते येथे राहणारी महिला मंगळवारी पतीसोबत मुरबाड रोडमार्गे मोटारसायकलवरून प्रवास करीत होती. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील दागिने खेचून पळ काढला.