ठाणे, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवलीतील गुन्ह्य़ांमध्ये वाढ
अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक गुन्हेगार आता अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे यांसारख्या शहरी भागात येऊन गुन्हे करू लागल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होऊ लागले आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरलगत असलेल्या ग्रामीण भागासाठी कार्यरत असलेले कुळगाव ग्रामीण पोलीस ठाणे येत्या काळात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आणले जावे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी तयार केला आहे. ग्रामीण भागातील गुन्हेगारीवर बारीक लक्ष ठेवणे यामुळे सहज शक्य होईल, असा ठाणे पोलिसांचा दावा आहे.
उल्हासनगरच्या परिमंडळ चार येथील पोलीस उपायुक्तांनी यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे पाठविण्यात आला असून या परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा आहे, असा दावा ठाणे पोलिसांकडून केला जात आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत सध्या ३३ पोलीस ठाणी येतात. उल्हासनगर परिमंडळांतर्गत आठ पोलीस ठाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. अंबरनाथ तालुक्यात एकूण पाच पोलीस ठाणी असून त्यातील चार पोलीस ठाणी ही शहर पोलिसांच्या अखत्यारीत येतात. बदलापूर शहरात कुळगाव ग्रामीण हे पोलीस ठाणे असून ते उर्वरित अंबरनाथ ग्रामीण भागासाठीचे पोलीस ठाणे म्हणून कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांपासून या ग्रामीण भागातील गुन्हेगारांनी नजीकच्या उपनगरांत जाऊन गुन्हेगारी कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी बदलापूर पूर्वेला एसबीआय बँकेच्या शाखेवर पडलेल्या दीड कोटींच्या दरोडय़ातील महत्त्वाचा गुन्हेगार हा वांगणी येथे राहणारा होता. तर नुकतीच रिव्हॉल्वर पकडण्याची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांतील पिस्तूल तस्करी करणारा मुख्य आरोपी शंकर पारधी व त्याचा साथीदार हेदेखील या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत.
तसेच, अनेक गुन्हेगार या लांबच्या भागातून येथे येऊन शहरांमध्ये जाऊन गुन्हे करत आहेत. त्यामुळे हा ग्रामीण भाग ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत घेण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

अंबरनाथ ग्रामीण भागातून अनेक गुन्हेगार नजीकच्या उपनगरांत येऊन गुन्हे करत असल्याचे आढळत असून त्यांच्यावर करण्यात येणारी कारवाई अधिक सोपी व्हावी या दृष्टीने यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कुळगाव पोलीस ठाण्याच्या परिसराचा ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत समावेश झाल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण तसेच तपासही सुलभ होऊ शकेल. त्यामुळे यासंबंधीचा सविस्तर अहवाल ठाणे पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आला आहे.
– वसंत जाधव, पोलीस उपायुक्त, उल्हासनगर परिमंडळ चार