कोणत्याही शहराच्या जडणघडणीत तेथील ग्रंथालयांचा मोलाचा वाटा असतो. शहरातील वाचनालये किती समृद्ध आहेत, यावरून त्या शहराची सांस्कृतिक श्रीमंती मोजली जाते. ठाणे परिसरात अगदी शकतोत्तर परंपरा असलेली अनेक ग्रंथालये असून आपापल्या परीने वाचन संस्कृतीची परंपरा जोपासत आहेत. त्यातील काही ठळक ग्रंथालयांचा परिचय करून देणारे हे नवे सदर..
मुंबईलगत असलेल्या ठाण्याची सध्या देशातील प्रमुख महानगरांमध्ये गणना होत असली तरी त्याचा प्राचीन इतिहासही तितकाच समृद्ध आहे. दोन हजार वर्षांपासून येथे नांदणाऱ्या संस्कृतीच्या खुणा आढळून येतात. दुर्दैर्वाने त्या खुणा जपण्यासाठी मुंबईसारखे सुसज्ज वस्तुसंग्रहालय ठाणे शहरात नाही. त्यामुळे भूतकाळातील कला-संस्कृतीच्या खुणा ठिकठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत आहेत.  आधुनिकीकरणच्या रेटय़ात त्यातील अनेक खुणा नष्ट होत आहेत. केवळ रस्ते, नाटय़गृह, तरण तलाव, मॉल्स, सिनेमाघरे म्हणजे शहरविकास नव्हे. त्याचबरोबरीने येथील कला-संस्कृतीच्या खुणा भविष्यातील पिढय़ांसाठी जतन करायला हव्यात, या तळमळीने डॉ. विजय बेडेकर यांनी ठाणे शहरात १९८४ मध्ये प्राच्य विद्या अभ्यास संस्थेची स्थापना केली. ठिकठिकाणी सापडणाऱ्या प्राचीन शिल्पशिळा, वास्तुखुणा, हस्तलिखिते, पोथ्या संकलित करून जतन करण्याचे कार्य ही संस्था गेली पंचवीसहून अधिक वर्षे करीत आहे.
मानवी जीवन समृद्ध करण्यात कथा, कादंबऱ्या, काव्य आदी ललित वाङ्मय उपयुक्त आहेच, पण ज्ञान, विज्ञान, भाषाशास्त्र, ज्योतिष, पुरातत्त्व आदी विषयांची मूलभूत माहिती देणारी ४० हजारहून अधिक दुर्मीळ ग्रंथसंपदा हे प्राच्यविद्याची खरी श्रीमंती आहे. कुणाही संशोधकास अथवा अभ्यासकास हे अक्षर वाङ्मय उपलब्ध करून दिले जाते. मुंबई विद्यापीठाचे डॉ. मोरायसेस यांनी त्यांच्या व्यक्तिगत संग्रहातील पाच हजार ग्रंथ अभ्यास संस्थेस उपलब्ध करून दिले. कल्याणचे समकालीन इतिहासकार साने, पुरातत्त्व विभागाचे गुणे, मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रभू आदी अनेकांनी आपल्या संग्रहातील दुर्मीळ ग्रंथ अनेकांच्या उपयोगी पडावेत या हेतूने अभ्यास संस्थेस भेट म्हणून दिले.  

अमूल्य ग्रंथसंपदा

या ग्रंथ भांडारात भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संशोधन पत्रिका, संस्कृत नाटय़कोश, गणित भारती, सकल भारतीय संत वाङ्मय, रामायण, महाभारत, संस्कृत-हिंदी, उर्दू मराठी असे विविध प्रकारचे शब्दकोश असे अनेक अमूल्य असे ग्रंथ या अभ्याससंस्थेत आहेत. याशिवाय अगदी १७ व्या शतकापासूनची अनेक हस्तलिखिते, पोथ्या येथे पाहायला मिळतात. १७४५ सालातली गणेश गीता, भगवद्गीता, १८३५ मध्ये लिहिलेली गोदान विधी संहिता अशी काही ठळक उदाहरणे देता येतील. डॉ. विजय बेडेकर आणि महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गोविंद स्वरूप यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांतून, त्यातही विशेष करून कोकणातून या प्राचीन संस्कृतीच्या खुणा आणल्या आणि जतन केल्या.   
संशोधकांसाठी अभ्यास दौरे
प्राच्यविद्या संस्थेतर्फे गेली सात-आठ वर्षे ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांत विद्यार्थी तसेच प्राध्यापकांसाठी अभ्यास दौरे आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे शिक्षकांसाठीही सांस्कृतिक व शैक्षणिक अभ्यास दौरे आखले जातात. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. अमेरिका, हॉलंड आणि ऑस्ट्रिया या ठिकाणी संस्थेतर्फे संस्कृत परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिका

विविध क्षेत्रांतील अद्ययावत संशोधनाची माहिती देणाऱ्या पत्रिका जगभरातील विविध संस्था प्रकाशित करीत असतात. त्या त्या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी त्या उपयुक्त असल्या तरी त्याची वर्गणी सर्वानाच परवडत नाही. कारण त्याची वर्गणी डॉलरमध्ये असते. प्राच्यविद्याने या अभ्यासपत्रिका इच्छुकांना विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. इंग्लडमधील ब्रिटिश म्युझियम, टेट मॉडर्न आर्ट म्युझियम, द आर्ट न्यूजपेपर, एशियन आर्ट न्यूजपेपर, हिस्ट्री टुडे, अ‍ॅन्थॉपॉलॉजी टुडे, फ्रेंड्स ऑफ द ब्रिटिश लायब्ररी, इंग्लिश हेरिटेज मेंबर्स मॅगझिन, लंडन टाइम्सची साहित्य पुरवणी, ब्रिटिश जर्नल ऑफ सायन्स हे इतिहासाचे नियतकालिक, रॉयल एशियाटिक सोसायटी व अमेरिकन ओरिएंटल सोसायटीचे अंक आदी अमूल्य नियतलिके येथे वाचकांना दररोज कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाहता, वाचता येतात.    

प्राचीन दस्तऐवजांचे स्वागत

अजूनही अनेक घरांमध्ये जुन्या वस्तू, प्राचीन ग्रंथ अथवा पोथ्या आहेत. जागेअभावी तसेच गरज नसल्याने अनेकदा या वस्तू एक तर रद्दीत काढल्या जातात अथवा अडगळीत टाकल्या जातात. अशांनी या वस्तू, ग्रंथ संस्थेस द्यावेत, असे आवाहन ‘प्राच्यविद्या’च्या वतीने करण्यात आले आहे.

प्राचीन गृहोपयोगी वस्तूंचा संग्रह
केवळ ग्रंथच नाही, तर प्राचीन काळी वापरली जाणारी धान्याची मापे, लामण दिवे, उखळ, जाते, अन्न वाढण्यासाठी लागणारे लाकडी डाव अशा विविध वस्तू येथे पाहायला मिळतात. डॉ. विजय बेडेकरांना भिवंडीतील शेतात सापडलेले सातवाहनकालीन पाटा वरवंटा, दागिने जपून ठेवण्यासाठी वापरली जाणारी दगड बँक अशा कितीतरी गोष्टी येथे आहेत. कोकणातील दाभोळ येथील अण्णा शिरगांवकर यांनी त्यांच्या संग्रहातील अनेक दुर्मीळ वस्तू प्राच्यविद्या अभ्यास संस्थेस दिल्या. दहाव्या शतकातील अनेक प्राचीन शिल्पकृती, मूर्ती येथे आहेत.    

प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे</strong>
प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे कला केंद्र,  ठाणे महापालिका उर्दू शाळा क्र. ३२, १२६ जवळ, हजुरी रोड, ठाणे (प.).
http://www.orientalthane.com