२५ जुलैपर्यंत सविस्तर अहवाल देण्याचे ठाणे पालिका आयुक्तांचे आदेश
पावसाळ्यात धोकादायक इमारत कोसळून जीवित हानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी येत्या सोमवापर्यंत शहरातील सर्व अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून घेण्याचे आदेश साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. यासंबंधीचा सविस्तर अहवाल २५ जुलैपर्यंत सादर करावा, असे निर्देशही जयस्वाल यांनी दिले आहेत. तसेच इमारती रिकाम्या करताना अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
ठाणे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले असून त्यानुसार यादी जाहीर केली आहे. नव्या सर्वेक्षणानुसार ठाणे, कळवा आणि मुंब्रा परिसरात ५० हून अधिक इमारती अतिधोकादायक ठरल्या असून धोकादायक इमारतींचा आकडा शेकडोंच्या घरात आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे एखादी इमारत कोसळून जीवित हानी होऊ नये यासाठी जयस्वाल यांनी एका आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीत येत्या सोमवापर्यंत अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश त्यांनी सर्व साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या आढावा बैठकीत जयस्वाल यांनी धोकादायक इमारती, खड्डे, आरोग्यविषयक समस्या, पावसाळ्यात पाणी साचणे आदींचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, नगर अभियंता, उपनगर अभियंता, प्रभाग समितीचे सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते. धोकादायक इमारतींच्या दोन याद्या तयार करण्यात आल्या आहेत.