ठाणे महापालिकेकडे ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना अनेक वेळा पैसे जमा केल्यानंतरही त्या व्यवहाराची पावती मिळत नसे. त्यामुळे नागरिकांना महापालिकेचे हेलपाटे घालत पैशांचा परतावा मिळवावा लागत होता, तसेच पुन्हा नव्याने मालमत्ता कराचे पैसे भरावे लागत होते. यामुळे ऑनलाइन कर भरणे म्हणजे नुसता मनस्ताप असा समज नागरिकांमध्ये रूढ होऊन या पद्धतीकडे करदात्या नागरिकांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली होती. हे लक्षात येताच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रचलित मालमत्ता कर भरणा कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करत ऑनलाइन पैसे भरल्यानंतर चार दिवसांमध्ये नागरिकांच्या ई-मेलवर पावती पाठवण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संगणक प्रणालीत आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

नवी प्रणाली अशी आहे..
’या प्रणालीनुसार ऑनलाइन पद्धतीने पैसे भरणा करून बँकेतून पैसे कापले गेल्याचा पुरावा सादर करताना मालमत्ता कर विभागाकडून चार दिवसात पावती मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
’त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने कर भरणाऱ्या नागरिकांचे ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक, वन टाइम पासवर्ड (ओटीपी) नोंद करण्यासाठी संगणक प्रणालीमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत.