ग्रामीण भागातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ठाणे जिल्हा परिषदेने यंदा उत्तम गुणांनी दहावी उत्तीर्ण होणाऱ्या जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून येत्या जून महिन्यात दहावीचे निकाल लागल्यानंतर ग्रामीण भागात गुणवत्तेनुसार अव्वल ठरलेल्या किमान २५० विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे.

जिल्हा विभाजन आणि २७ गावांचे कल्याण-डोंबिवली महापालिकेत झालेले विलीनीकरण यामुळे जिल्हा परिषदेचे क्षेत्रफळ कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या १०५ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प  ७७ कोटी ४७ लाख रुपयांचा आहे.