20 January 2019

News Flash

चोरीचा मुद्देमाल परत करण्यात ठाणे ग्रामीण पोलीस अव्वल

सोनसाखळी चोरीच्या प्रकरणातील लाखो रुपयांचा माल मूळ मालकाला परत

चोरीच्या प्रकरणातील हस्तगत सोने पोलिसांनी मूळ मालकांना परत केले.

सोनसाखळी चोरीच्या प्रकरणातील लाखो रुपयांचा माल मूळ मालकाला परत

गुन्ह्य़ांमध्ये चोरण्यात आलेला मुद्देमाल गुन्हेगारांकडून ताब्यात घेऊन ते संबंधितांना परत करण्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांनी राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. नियमातील तरतुदीचा आधार घेत विक्रमी वेळेत मुद्देमाल परत करण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत. मीरा-भाईंदर शहरात झालेल्या सोनसाखळी चोरीच्या प्रकरणातील जप्त करण्यात आलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल नववर्षांचे औचित्य साधून परत करण्यात आला.

गुन्ह्य़ांमध्ये चोरी झालेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला तरी तो संबंधितांना परत करण्यासाठी न्यायालयाची कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. यात बराच कालावधी लागतो. मात्र काही प्रकरणात मुद्देमाल परत करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशांची आवश्यकता भासत नाही. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार पोलिसांनाही हे अधिकार देण्यात आले आहेत. याचाच आधार घेत ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्य़ात घडलेल्या विविध गुन्ह्य़ांत आरोपींकडून हस्तगत केलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह, दुचाकी, मोबाइल तसेच इतर वस्तू असा सहा हजारांहून अधिक मुद्देमाल ठाणे ग्रामीण संबंधितांना परत केला असून गुन्ह्य़ातील मुद्देमाल परत करणाऱ्यांमध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांचा राज्यात पहिला क्रमांक लागला आहे.

मीरा-भाईंदर शहरात गेल्या वर्षभरात सोनसाखळी चोरीच्या ५६ घटना विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या. दुचाकीवरून येऊन एकटय़ा-दुकटय़ा महिलेला अथवा वरिष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रमाण जास्त होते. सोनसाखळी खेचण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी विशेष गस्ती पथक नेमली होती. यात अनेक गुन्हे उघडकीस आले, यात थेट दिल्लीहून सोनसाखळी चोरीसाठी मीरा-भाईंदरमध्ये येणाऱ्या दोन टोळ्यांचा समावेश आहे.  पोलिसांनी जप्त केलेले २० लाख रुपये किमतीचे ८३० ग्रॅम सोन्याचे दागिने परत केले, शिवाय काही रोख रक्कम आणि मोबाइलही परत केलेले आहेत.

घडलेल्या ५६ गुन्ह्य़ांमधून ३४ गुन्ह्य़ांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आणि आरोपींकडून सुमारे ११ लाख २८ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले. फौजदारी प्रक्रिया संहितामधील (सीआरपीसी) कलम १०२च्या तरतुदीनुसार जप्त केलेला माल परत करण्याचा अधिकार पोलिसांनाही देण्यात आला आहे. या तरतुदीचा आधार घेत नववर्षांची भेट म्हणून जप्त केलेल्या सोनसाखळ्या संबंधितांना विक्रमी वेळेत परत करण्यात आल्या. या वेळी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत कदम आदी उपस्थित होते.

First Published on January 3, 2018 2:23 am

Web Title: thane rural police top in robbery case solved