News Flash

ठाणे ते गेटवे जलवाहतूक

सिडकोने काही वर्षांपूर्वी मुंबई ते नवी मुंबईदरम्यान प्रवासी वाहतुकीचा प्रकल्प सुरू केला होता.

 

अहवाल तयार करण्याच्या पालिका आयुक्तांच्या सूचना

एकीकडे येत्या दोन वर्षांत मुंबई ते नवी मुंबईदरम्यान प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असतानाच ठाणे महापालिकेनेही आपल्या नियोजित प्रवासी जलवाहतुकीची कक्षा रुंदावण्याचा निर्णय घेतला आहे. वसई-मीरा भाईंदर-ठाणे अशी जलप्रवास सुविधा सुरू करण्यासोबतच ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया अशी जलवाहतूक तयार करण्याचा पालिकेचा मानस आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अभियांत्रिकी विभागाला यासंदर्भात अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. वसई-मीरा भाईंदर ते ठाणे या मार्गावर जलवाहतूक सुरू करण्यासाठी सुमारे २८० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिकेने तयार केले असून त्याचे सादरीकरण गुरुवारी केंद्र सरकारकडे होणार आहे.

सिडकोने काही वर्षांपूर्वी मुंबई ते नवी मुंबईदरम्यान प्रवासी वाहतुकीचा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, महागडी सेवा आणि प्रवाशांची अपुरी संख्या यामुळे ही वाहतूक पुढे बंद पडली. त्यानंतर नवी मुंबई महापालिकेने सातत्याने आग्रह धरल्याने राज्य सरकारने मुंबई ते नवी मुंबईदरम्यान जलवाहतूक प्रकल्पांची आखणी केली आहे. गेट वे ऑफ इंडिया ते नेरुळदरम्यान खाडीकिनारी जेट्टी उभारून जलवाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला असून येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पुर्ण करता येईल, अशी घोषणा नुकतीच मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान, नवी मुंबई-मुंबईदरम्यान जलवाहतुकीचे प्रकल्प जोर धरीत असताना ठाणे महापालिकेने अंतर्गत तसेच बाह्य़ जलवाहतूक प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्पांचे सादरीकरण सरकारी यंत्रणांकडे करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अर्थसंकल्प सादर करताना ठाणे-वसई-मीरा भाईंदर या परिसरात अंतर्गत जलवाहतूक सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. यासंबंधी आराखडा तयार केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली होती. गेल्या सहा महिन्यांच्या कामानंतर यासंबंधीचा आराखडा तयार करण्यात आला असून सुमारे २८० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवालाचे गुरुवारी केंद्रीय मंत्रालयाकडे सादरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.

घोडबंदर मार्ग, कोलशेत, साकेत, दिवा असा हा मार्ग असून भिवंडी-कल्याण या मार्गावरही विस्तारीकरण केले जाऊ शकते, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. हे करीत असताना ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया आणि ठाणे ते सीबीडी सेक्टर-११ असे दोन नवे मार्गही प्रस्तावित करण्यात आले असून या मार्गाचे प्राथमिक अहवाल तयार करण्यात आले आहेत. ठाणे ते गेट वे हा मार्ग ४१ किलोमीटरचा असून महापालिकेच्या प्राथमिक अहवालानुसार या मार्गावर प्रवासासाठी ६३ मिनिटांचा कालावधी लागू शकेल. ठाणे-सीबीडी दरम्यान आखण्यात आलेल्या मार्गावर ५५ मिनिटांचा प्रवास वेळ अपेक्षित धरण्यात आला असून पुढील टप्प्यात या मार्गाची आखणी केली जाणार आहे. या मार्गाचे आराखडे तयार करून सरकारच्या मान्यतेसाठी ते ठेवले जातील, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.ू

भविष्यात जलवाहतुकीचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. त्यामुळे यासंबंधीचे प्राथमिक आराखडे आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून ते सरकारपुढे ठेवले जात आहेत.

– संजीव जयस्वाल, ठाणे महापालिका आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 2:51 am

Web Title: thane to gateway water transportation
Next Stories
1 ठाण्यातील राम मारुती मार्गावर बेकायदा टपऱ्यांची रांग!
2 लहान बंधारे बांधा, पण ‘शाई’ नको!
3 टीएमटी सुधारा शिवसेनेचे आयुक्तांकडे आर्जव
Just Now!
X