ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील घटना

सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मंगळवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसात ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर ताडाचे झाड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अमन शेख (१९) आणि रूपचंद दीपक जैसवाल (३०) अशी मृतांची नावे असून अमन हा मुंब्य्रातील तर रूपचंद हा ठाण्यातील नौपाडा भागातील रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी शहरातील पाचपाखाडी भागात झाड पडल्याने किशोर पवार या तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे शहरातील धोकादायक झालेल्या झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मंगळवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे स्थानकाबाहेरील एसटी डेपोजवळील एक ताडाचे झाड आडोशाला उभ्या असलेल्या अमन आणि रूपचंद यांच्यावर कोसळले. या घटनेनंतर दोघांनाही ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील अमन याचा मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रूपचंद यांची प्रकृती स्थिर होत नसल्याने त्यांना बुधवारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठाणे शहरातील विविध भागांत या वर्षी वृक्ष उन्मळून पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शहरात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या पावसामुळे सुमारे ६३२ वृक्ष उन्मळून पडले आहेत. यामध्ये नौपाडय़ात वृक्ष उन्मळून पडलेल्या घटनेत एक जण जखमी झाला होता, तर वागळे इस्टेट येथे रिक्षावर झाड कोसळल्याने रिक्षाचालक हा जायबंदी झाला होता. मंगळवारी रात्री कोसळलेले झाड खोडाच्या अध्र्या भागापासून तुटलेले आहे. त्यामुळे झाड तुटले की यापूर्वी तोडण्याचा प्रयत्न झाला होता, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाणे शहरात बुधवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात कोपरी येथील सिद्धार्थनगर परिसरात एक झाड उन्मळून पडले आहे. तर शहरात सहा ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याचे ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे सांगण्यात आले.