19 September 2020

News Flash

ठाण्यातील ‘थीम पार्क’च्या कामाची चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुरावे सादर

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुरावे सादर

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून घोडबंदर भागात उभारण्यात आलेल्या जुने ठाणे नवीन ठाणे या थीम पार्कच्या कामांच्या खर्चाचे पुरावे सादर करीत कामात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत केला आहे.

या पुराव्यानंतर महापालिका प्रशासनानेही आरोपांमध्ये तथ्य असल्याचे मान्य करत याप्रकरणी यापूर्वीच त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी सुरू केल्याचे स्पष्ट केले.  आयुक्त, माजी महापौर, काही नगरसेवक आणि लेखापरीक्षण अधिकाऱ्यांची समिती नेमून त्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव सर्वपक्षीय नगरसेवकांनी यावेळी केला. या अहवालानंतर त्यामध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

घोडबंदर भागातील जुने ठाणे- नवीन ठाणे या थीम पार्कच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून शहरात सुरू असतानाच गुरुवारच्या सभेत  रेल्वेच्या प्रतिकृतीसाठी १ कोटी ६५ लाख, शिवाजी महाराजांच्या  पुतळ्यासाठी ८० लाख, जमीन खोदण्यासाठी पाच कोटी रुपये आणि इतर कामांच्या खर्चाचे पुरावे सादर करत या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. दोन कोटी रुपयांचेही काम झालेले नसतानाही १६ कोटी रुपये खर्च कसे करण्यात आले आणि त्यासाठी निधी कसा मंजूर करण्यात आला, असा प्रश्न सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. कळव्याच्या चौकात शिवाजी महाराजांच्या २५ फुटी पुतळय़ासाठी २० लाख रुपये खर्च झाला आहे, तर थीम पार्कमधील पुतळ्यासाठी ८० लाख रुपये कसे खर्च झाले, असा प्रश्न विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी उपस्थित केला.

पार्कच्या कामाचे ३६ लाखांचे बिल सादर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीनंतर दोन लाख ५० हजाराचे काम असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला अद्याप बिल देण्यात आलेले नसल्याचे उद्यान विभागाकडून सभागृहात सांगण्यात आले. त्यामुळे आक्रमक झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि त्याच्याकडून झालेला खर्च वसूल करण्यात यावा, असे आदेश दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 1:47 am

Web Title: theme park scam in thane
Next Stories
1 डोंबिवलीतील लोढा विहारमध्ये दोन ते तीन गाड्यांना आग
2 उल्हासनगरमध्ये कुत्र्याने चिरमुरडीच्या नाकाचा लचका तोडला
3 ‘ट्रॅमोडॉल’च्या विक्रीप्रकरणी चौघांना अटक
Just Now!
X