ठाणे, नाशिक, गुजरात आणि उरण या भागांतील अवजड वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर तीन फूट खड्डा पडल्याचा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. सुरक्षेखातर या खड्डय़ाभोवती मार्गरोधक लावल्याने ठाणे-पनवेल मार्गिकेवर दोनऐवजी एकाच मार्गिकेवरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी दुरुस्ती काम केलेल्या ठिकाणीच हा खड्डा पडल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

जेएनपीटी बंदरातील अवजड वाहने ठाणे, भिवंडी, नाशिक आणि गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. येथून दररोज सुमारे दहा हजार वाहनांची ये-जा असते. गेल्या वर्षी या मार्गावरील रेतीबंदरजवळचा पूल धोकादायक झाला होता. तातडीने हाती घेतलेल्या या दुरुस्ती कामासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला होता. तोपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. या मार्गावरील वाहतूक ठाण्यातून वळविली होती.

काही महिन्यांपूर्वी या पुलावरील रस्ता उंचसखल झाला होता. तसेच सिमेंट काँक्रीटचा थर वाहून गेल्याने लोखंडी गज दिसत होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर टीका होऊ लागली होती. असे असतानाच रेतीबंदरजवळील या मार्गाच्या पायथ्याशी असलेल्या पुलावर तीन फूट खड्डा पडल्याचा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर खड्डय़ामुळे अपघात होऊ नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागाने खड्डय़ाभोवती मार्गरोधक उभारले.

मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी

रविवारी अवजड वाहनांची वाहतूक कमी असल्याने मोठय़ा प्रमाणात कोंडी झाली नाही. मात्र, सोमवारनंतर या ठिकाणी मोठी कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वर्षभरापूर्वी दुरुस्ती करण्यात आलेल्या ठिकाणीच हा खड्डा पडल्याने या कामावरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता आशा जठाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.