बांधकाम व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी आणखी तीन जण अटकेत

ठाणे : भिवंडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी या भागातील मोहंमद खालीद शेख ऊर्फखालिद गुड्ड याला अटक होताच या भागातील बिल्डरांना धमकावून खंडणी वसूल करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या टोळीची माहिती पुढे येऊ लागली आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी आणखी एका प्रकरणात तिघांना अटक केली आहे. हे तिघेही खालीद गुड्ड याचे निकटवर्तीय मानले जातात.

अरविंद जैस्वार, हमीद शेख, रियाज शेख असे अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी ठाणे पोलिसांनी खालीद गुड्ड व त्याचे साथीदार इफ्तीखार शेख, गुलाम खान, फैज आलम यांना अटक केली. ही टोळी बांधकाम व्यावसायिकाच्या कामांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून याचिका मागे घेण्यासाठी पैसे उकळत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनीही आता या टोळीविरोधात बांधकाम व्यावसायिकांना तक्रारी करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

वादग्रस्त राजकीय पार्श्वभूमी

खालीद गुड्ड हा अनेक वर्षे भिवंडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखपदी होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ठाण्यातील काही नेत्यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्याचा समावेश होत असे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर खालीदने एमआयएम पक्षात प्रवेश केला आणि भिवंडी पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्याने चांगली मते मिळवली. सध्या तो एमआयएमचा भिवंडी जिल्हाध्यक्ष आहे. त्याला आणि त्याच्या तीन साथीदारांना काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाकडून त्याने २४ लाख रुपये उकळले होते. खालीदची ही टोळी भिवंडी येथील बांधकाम व्यावसायिकांकडून अनधिकृत बांधकामाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून त्यांच्याकडून खंडणी उकळत असल्याचेही आता समोर आले आहे. भिवंडीतील बिल्डरने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्यांनी अटक केली.