रुग्णसंख्या वाढत राहिल्यास कठोर निर्बंध लादण्याची पालिका आयुक्तांची तंबी

ठाणे : शहरात करोना रुग्णांची संख्या वाढू लागली असली तरी अद्याप तरी नवे निर्बंध लागू करण्याचा विचार नसल्याचे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. त्याचवेळी येत्या आठ दिवसांत रुग्णवाढ कायम राहिली तर टाळेबंदीसारख्या कठोर निर्बंधांचा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. अशा निर्बंधांची वेळ येऊ नये, यासाठी नागरिकांनी करोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर पालिका आणि पोलिसांमार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज ७० ते ८० करोना रुग्ण आढळून येत आहेत, परंतु गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून बुधवारी ११२, तर गुरुवारी २०१ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णवाढीनंतर सतर्क झालेल्या पालिका यंत्रणेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यासंबंधीची माहिती आयुक्त डॉ. शर्मा यांनी शुक्रवारी दिली.

गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून शहरात करोना चाचण्या साडेपाच हजारांपेक्षा जास्त करण्यात येत होत्या. परंतु करोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून चाचण्यांची संख्या कमी करण्यात आली असून दिवसाला साडेचार हजार चाचण्या केल्या जात होत्या. आता रुग्णसंख्या वाढल्याने शहरात पुन्हा दररोज साडेपाच हजार चाचण्या केल्या जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वी एकूण चाचण्यांमध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अडीच टक्के इतके होते. परंतु गेल्या दोन दिवसांत हे प्रमाण पाच टक्क्यांच्या आसपास आहे, असे त्यांनी सांगितले.

शहरात अद्याप कोणतेही नवे निर्बंध लागू करण्याचा विचार नसून जुन्याच नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पण, येत्या आठ दिवसांमध्ये रुग्णसंख्येचा आकडा वाढतच राहिला तर टाळेबंदीसारख्या कठोर निर्बंधाचा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शहरातील मोठय़ा आस्थापना तसेच  बाजारपेठा, रेल्वे स्थानक, बस थांबे या ठिकाणी चाचणी केंद्र सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले.

संशयित रुग्णांची तपासणी सक्तीची

करोना प्रतिबंधित क्षेत्रातील हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी अशी लक्षणे असलेली व्यक्ती आली तर, त्यांची लगेचच करोना चाचणी करावी, अशा सूचना सर्वच डॉक्टरांना देण्यात आल्या असून अशा संशयित रुग्णांसाठी ग्लोबल कोविड रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून तिथे त्यांच्यावर उपचार केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपचार व्यवस्था

ठाणे महापालिकेच्या १०७४ खाटांचे ग्लोबल कोविड रुग्णालय असून तिथे २२६ खाटांचा अतिदक्षता कक्ष आहे. याशिवाय, पूर्वद्रुतगती मार्गाजवळील वाहनतळामध्ये ११७७ खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यात आले असून तिथे १९६ खाटांचा अतिदक्षता कक्ष आहे. हे रुग्णालय फेब्रुवारी महिनाअखेपर्यंत सुरू होईल. त्यामुळे पालिकेकडे सद्य:स्थितीत दोन हजारपेक्षा जास्त खाटा उपलब्ध आहेत. आवश्यकता भासली तर खासगी रुग्णालये कोविड म्हणून घोषित करण्याची तयारी करण्यात आली आहे. याशिवाय, कोविड नियंत्रण कक्ष आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था अद्यापही सुरूच आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्याबाबतचे नियम यापुढेही लागू असणार आहेत., असेही पालिका आयुक्त शर्मा यांनी सांगितले.

४०५ आस्थापनांना नोटिसा

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील मॉल, चित्रपटगृह तसेच इतर अशा ४०५ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या सून त्यात नियमांचे पालन करण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. रिक्षा आणि बसमधूनही नियमापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असेल तर संबंधितांवर वाहतूक पोलीस कारवाई करतील, अशी माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी दिली.

‘गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे शहरात करोनाची दुसरी लाट आली आहे का, हे आता सांगता येणार नाही. परंतु येत्या आठ दिवसांतील रुग्णांची आकडेवारी पाहून त्यावर भाष्य करता येईल. 

– डॉ. विपीन शर्मा, महापालिका आयुक्त, ठाणे.