गेल्या काही वर्षांतील पालिका आयुक्तांच्या बिल्डरधार्जिण्या धोरणामुळे डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेने आता उत्पन्नवाढीसाठी हरतऱ्हेने प्रयत्न चालवले आहेत. ठाणे शहरात बडय़ा बिल्डरांचे मोठे विकास प्रस्ताव मार्गी लागण्यात अडसर ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी करण्याचा मार्ग आणखी प्रशस्त करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात १० हजारांची वाढ करून ते ३० हजार करण्यात आले आहे. अर्थात जेवढय़ा प्रमाणात छाटणी होईल तितक्या प्रमाणात पुनरेपण करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
ठाणे शहरात दिवसेंदिवस मोठमोठे गृहप्रकल्प उभारले जात असून त्यासाठी मोकळय़ा जमिनींवर वाढलेल्या हिरवाईवर बुलडोझर फिरवण्यात येत आहे. गृहप्रकल्पांसाठी होणाऱ्या वृक्षतोडीबाबत वारंवार तक्रारी आल्या आहेत. वर्षभरापूर्वी सर्वसाधारण सभेत सुमारे दीड हजारांहून अधिक वृक्ष कत्तलीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. मात्र, या प्रस्तावांना कायद्याप्रमाणे मंजुरी दिल्याचे सांगत पालिकेने आपले हात झटकले होते. आता तर वृक्षछाटणीतून अधिक उत्पन्न मिळवण्याची योजना पालिकेने आखली आहे. बिल्डरांच्या विकास प्रस्तावांच्या आड येणाऱ्या वृक्षांची कापणी करताना ठरावीक शुल्क आकारले जाते. मोठय़ा वृक्षांच्या कत्तलीसाठी महापालिका यापूर्वी २० हजार रुपयांचा दर आकारत असत. बिल्डरांच्या मोठय़ा गृह प्रकल्पांचा आर्थिक आवाका लक्षात घेता हा दर कमी असल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या. हे लक्षात घेऊन आता यामध्ये दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ठाण्याच्या पश्चिमेकडे संजय गांधी उद्यानाचा हिरवा गर्द परिसर असून गेल्या काही वर्षांत या जंगलाच्या अगदी पायथ्यापर्यंत बिल्डरांनी प्रकल्प उभे केले आहेत. यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षांची तोड करण्यात आली असून त्या तुलनेत किती प्रमाणात पुनरेपण केले गेले हा संशोधनाचा विषय आहे. असे असताना आता एका वृक्षामागे ३० हजार रुपये भरून झाडे कापणीचा बिल्डरांना मार्ग प्रशस्त होणार आहे.

पुनरेपण किती?
जेवढय़ा प्रमाणात झाडांची कत्तल केली जाईल तितक्याच प्रमाणात त्याचे पुनरेपण करण्याची सक्ती करण्यात आली आहे. पुनरेपणाचा सविस्तर अहवाल सादर केल्याशिवाय शहर विकास विभागामार्फत संबंधित प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, असा नियम आहे. या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होते का याविषयी एकंदरीत संभ्रमाचे वातावरण आहे. घोडबंदर मार्गावर पवईस्थित एका बडय़ा बिल्डरने मोठय़ा प्रमाणावर खारफुटीची कत्तल केल्याच्या तक्रारी असून काही ठिकाणी खाडी बुजविण्यात आल्याचे प्रकारही घडले आहेत. महापालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यासंबंधीच्या ढीगभर तक्रारी येऊनही फारशी प्रभावीपणे कारवाई होत नसल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.  

ठाकुर्लीतील हिरवाई वाचणार
कल्याण : ठाकुर्लीतील बारा बंगला भागातील २५० झाडे तोडण्याची परवानगी मागणारा मध्य रेल्वे प्रशासनाचा प्रस्ताव कल्याण डोंबिवली पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने फेटाळून लावला आहे. सहा महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने कल्याण डोंबिवली पालिकेकडे झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती.  
ठाकुर्लीतील बारा बंगला भागात रेल्वेची ६५ एकर जमीन आहे. या जमिनीवर एक हजारांहून अधिक विविध प्रकारचे वृक्ष आहेत. सुमारे १०० वर्षांपासून बहरलेल्या या वृक्षराजीच्या सान्निध्यात परिसरातील नागरिक सकाळ, संध्याकाळ भटकंती करत असतात. मात्र, हॉकी, अ‍ॅथलेटिक्सचे मैदान तयार करण्यासाठी येथील अडीचशे झाडे तोडण्याची परवानगी रेल्वेने पालिकेकडे मागितल्याने या हिरवाईवर मळभ पसरले होते. परंतु, स्थानिक नगरसेवक श्रीकर चौधरी आणि विभागातील नागरिकांनी एकमुखाने झाडे तोडण्यास विरोध केला होता. पर्यावरण संवर्धनासाठी ही झाडे खूप महत्त्वाची आहेत हे लक्षात आल्यावर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने रेल्वेचा प्रस्ताव फेटाळून लावण्याचा निर्णय बुधवारच्या बैठकीत घेतला.
जयेश सामंत, ठाणे</strong>