ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून फुकट प्रवास करणाऱ्यांना वचक बसावा म्हणून अशा फुकटय़ा प्रवाशांकडून दुप्पट दंड वसूल करण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला आहे. बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून यापूुर्वी ५० रुपये दंडाची रक्कम वसूल केली जात होती, मात्र नव्या निर्णयानुसार आता सर्वसाधरण बससाठी शंभर रुपये तर वातानुकूलीत बससाठी दोनशे रुपये इतकी दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे. या दंडासह बसच्या तिकीटाची रक्कमही फुकटय़ा प्रवाशाकडून वसूल केली जाणार असून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे.

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात ३१३ बसगाडय़ा असून त्यापैकी सुमारे दीडशे बसगाडय़ा प्रत्यक्षात रस्त्यावर धावतात. उर्वरित बसेस नादुरूस्त असल्याने आगारात धूळखात पडल्या आहेत. ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरातील ७४ बसमार्गावर टीएमटीच्या बसेस धावत असून दिवसभरात जवळपास चार हजारांच्या आसपास बसेसच्या फेऱ्या होतात. सकाळ तसेच सायंकाळच्या गर्दीचा फायदा घेऊन फुकटे प्रवासी बसमधून प्रवास करतात. अशा प्रवाशांवर टीएमटीच्या तिकीट तपासनीसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येते, मात्र दंडाची रक्कम ५० रुपये असल्यामुळे अशा प्रवाशांवर फारसा परिणाम होताना दिसून येत नाही. या पाश्र्वभूमीवर परिवहन व्यवस्थापनाने दंडाच्या रक्कमेत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.