News Flash

टीएमटीच्या विद्युत बसची प्रतीक्षाच

शंभरपैकी अवघी एकच बस परिवहनच्या ताफ्यात

संग्रहित छायाचित्र

शंभरपैकी अवघी एकच बस परिवहनच्या ताफ्यात

किशोर कोकणे, ठाणे 

ठाणेकरांना आरामदायक आणि सुलभ प्रवासाची खात्री देण्यासोबत इंधनबचत करणाऱ्या १०० विद्युत बस ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) ताफ्यात दाखल करण्याची घोषणा महापालिका प्रशासनाने केली होती. मात्र, आतापर्यंत अवघी एकच विद्युत बस टीएमटीच्या ताफ्यात आली असल्याने बाकीच्या बस कधी येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठाणे महापालिकेने वर्षभरापूर्वी पीपीपी तत्त्वावर टीएमटीच्या ताफ्यात एक विद्युत बस दाखल केली होती. या वेळी फ्रान्सच्या वाणिज्यदूत कार्यालयाचे आर्थिक सल्लागार जीन मार्क मिगनॉन यांनाही बोलविण्यात आले होते. ही बस रस्त्यावर धावल्यानंतर विजेवर धावणाऱ्या आणखी १०० बस टप्प्याटप्प्याने दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. मात्र, वर्ष उलटल्यानंतरही वर्षभरापूर्वी दाखल झालेल्या बसगाडीव्यतिरिक्त एकही बसगाडी परिवहन सेवेत दाखल झालेली नाही. ठाणे महापालिकेला संबधित कंपनीकडून कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने या प्रस्तावाला विलंब होत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता. मात्र, यासंबधी एका अधिकाऱ्याला विचारले असता, विजेवर धावणाऱ्या बसगाडय़ा येत्या ऑक्टोबर महिन्यात दाखल होणार असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.

चार्जिग स्थानके अपूर्ण

महापालिकेकडून १०० बसगाडय़ा ऑक्टोबर महिन्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत असला तरी, विजेवर चालणाऱ्या या बस चार्जिग करण्यासाठी आनंदनगर येथे एकमेव केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यामुळे बसगाडय़ा दाखल झाल्या तरी, त्यांचे चार्जिग कुठे करणार, हा प्रश्न आहे.

विद्युत बसची वैशिष्टय़े

१०० टक्के बॅटरीवर धावणारी ही बस एकदा चार्ज केल्यास २२० किमी. अंतर धावते. ही संपूर्ण वातानुकूलित बस असून दरवाजांना सीसीटीव्ही कॅमेरे, ई-तिकीट, मोबाइल चार्जिग, एलईडी टीव्हीदेखील यात आहे. यातून महापालिकेला संबधित कंपनीकडून प्रत्येक बसमागे  प्रतिवर्षी १ लाख २० हजार रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 1:25 am

Web Title: tmt waiting for electric bus zws 70
Next Stories
1 ऐन पावसाळय़ात दिव्यात पाणीटंचाई
2 वसई किनाऱ्याची धुळधाण
3 शालेय मुले अमली पदार्थाच्या विळख्यात
Just Now!
X