सामाजिक माध्यमांद्वारे आवाहन करणारे संदेश
किशोर कोकणे, लोकसत्ता
ठाणे : करोना टाळेबंदी शिथिलीकरणानंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बाजारपेठा फुलल्या असल्या तरी, अनेक जण ऑनलाइन वस्तू खरेदी करत आहेत. त्याचा फटका दुकानदारांना बसत आहे. या ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यासाठी व्यापाऱ्यांनी मोबाइलवर संदेश पाठवून त्याद्वारे पारंपरिक दुकानांमध्ये खरेदी करण्याचे फायदे आणि ऑनलाइनद्वारे खरेदी करण्याचे तोटे या विषयी जनजागृती सुरू केली आहे.
ठाण्यातील नौपाडा, गोखले रोड येथील व्यापारी दिवाळीच्या ८ ते १० दिवस आधीपासून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना तयार करत असतात. पंरतु त्यांच्यापुढे ऑनलाइन वस्तू विक्री करणाऱ्या कंपन्यांचेही मोठे आव्हान उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सुमारे अडीच हजारांहून अधिक व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या ठाणे व्यापारोद्योग महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी एक बैठक घेतली. यामध्ये ग्राहकांना आपल्याकडे वळविण्यासाठी काय करता येईल, याविषयी चर्चा करण्यात आली. त्यात पारंपरिक दुकानातून खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोबाइलवर संदेश पाठविण्याचे आणि समाजमाध्यमावर नागरिकांना आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी व्यापाऱ्यांनी आता सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ठाणे व्यापारोद्योग महासंघ आणि व्यापारी ग्राहकांना संदेश पाठवू लागले आहेत. त्यात ‘दिन-दिन दिवाळी, चला जवळच्याच दुकान-आळी’, ‘वोकल फॉर लोकल’, ‘किरकोळ व्यावसायिकांना सहकार्य करा’, अशा आशयाचे संदेश पाठविण्यात येत आहेत. ऑनलाइन खरेदीचे तोटे आणि पारंपारिक खरेदीमुळे देशाला होणारा फायदा याची माहिती दिली जात आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दुकानात सॅनिटायझर, मास्क आणि अंतरनियमांचे पालन करतो. याचीही माहिती ग्राहकांना दिली जाते. त्यास ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात येत आहे.
दिवाळीनिमित्ताने गोखले रोड, नौपाडा यांसारख्या भागात खरेदीसाठी मोठी गर्दी असते. यावर्षी ग्राहक जरी ऑनलाइनकडे वळले असले तरी आम्ही आता ग्राहकांना ऑनलाइन खरेदीचे तोटे आणि पारंपरिक खरेदीमुळे होणारे फायदे याबद्दल समाजमाध्यमे आणि मोबाइल संदेशाद्वारे पटवून देत आहोत. त्यास ग्राहकांकडूनही प्रतिसाद मिळत असून हळूहळू बाजारात गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे.
– आशीष शिरसाट, वरिष्ठ उपाध्यक्ष, ठाणे व्यापारोद्योग महासंघ