सावरकर-लोकमान्य नगरांतील वाहतूक कोंडी कायम

ठाण्यातील दाट लोकवस्तीचे आणि वर्दळीचे परिसर असलेल्या यशोधरनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर आणि महात्मा फुलेनगर या भागांतील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी राबवलेला वाहतूक बदलाचा प्रयोग पूर्णपणे फसल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी केलेल्या बदलानुसार वाहतूक करण्याकडे वाहनचालकांनी दुर्लक्ष केल्याने या ठिकाणची वाहतूक कोंडी वाढू लागल्याचे चित्र आहे. परिणामी आता पोलिसांनी हा प्रयोगच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमान्यनगर, यशोधननगर आणि महात्मा फुलेनगर या भागांत मोठय़ा प्रमाणावर लोकवस्ती आहे. लोकमान्यनगर येथे ठाणे परिवहन विभागाचे आगार आहे या आगारातून यशोधननगर आणि सावरकरनगर मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या बसची संख्या ही जास्त आहे. यशोधननगर मार्गे वर्तकनगर, देवदयानगर आणि उपवन या भागांत प्रवास करणाऱ्या वाहनांचे प्रमाण अधिक आहे. लोकमान्यनगर येथून यशोधननगर आणि सावरकरनगर भागांतून पुढे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ अधिक आहे. लोकमान्यनगर ते कामगार नाका मुख्य रस्त्यावरील वाहतूकीचा मार्ग हा अतिशय अरुंद आहे. या अरुंद रस्त्यावर परिवहन विभागाची बस किंवा अन्य इतर मोठे वाहन प्रवास करत असल्यास वाहतूक विस्कळीत होते. त्यातच यशोधननगर चौकातील बेकायदा रिक्षा थांबा, अनधिकृत फेरीवाले यांमुळे येथे वाहतूक कोंडी होत असते.

ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एप्रिल महिन्यात प्रायोगिक तत्त्वावर वागळे इस्टेट वाहतूक उपशाखेतर्फे बदल करण्यात आले होते. मात्र एक महिन्यानंतर या बदलाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने वाहतूक विभागाने हा बदल रद्द करण्याचे ठरवले आहे. कामगार नाक्यावरून महात्मा फुलेनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मधल्या मार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या वाहनांना सावरकरनगर येथून यशोधननगर चौकातून अहिंसा मार्गाने पुढे महात्मा फुलेनगरला जावे लागत आहे. हा वळसा टाळण्यासाठी वाहनचालक प्रवेशबंदी असलेल्या मार्गानेच आत शिरतात. परिणामी कामगार नाका ते यशोधननगर या मुख्य मार्गावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता हा प्रायोगिक बदलच रद्द करण्याचे ठरवले आहे.

प्रवेश बंदचा फलक धूळ खात

महात्मा फुलेनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मद्रेचा मार्गावर प्रवेश बंदी दर्शवणारा फलक ठाकूर शाळेजवळील मुख्य चौकात वागळे इस्टेट वाहतूक शाखेतर्फे लावण्यात आला होता. मात्र हा फलक पूर्णपणे मोडला गेला असून तो भलत्याच ठिकाणी धूळ खात पडला आहे. तसेच या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात नसल्याचे बेशिस्त वाहनचालकांचे फावले आहे.

वाहतूक मार्गात बदल केल्याच्या दिवसापासून त्या ठिकाणी चार दिवस सुरुवातीला पोलीस कर्मचारी या चौकात तैनात केले होते. मात्र नागरिक नियम पाळत नव्हते. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांशी, वाहनचालकांशी याविषयी चर्चा करण्यात आली. वाहनचालकांच्या वाहतूक कोंडीविषयीच्या नेमक्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे एकंदरीतच या भागात निर्माण झालेली वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी अगोदर करण्यात आलेला प्रायोगिक तत्त्वावरील वाहतूक बदल मागे घेण्याचे ठरवले आहे. – अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वागळे वाहतूक उपशाखा