वसई परिहवन कार्यालयात २०१६ मध्ये ७८ हजार वाहनांची नोंद; वाहतूक कोंडी, ध्वनिप्रदूषण, पार्किंगच्या समस्येत वाढ

वसई-विरारच्या रस्त्यावर वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असला तरी त्यात दिवसेंदिवस वाढ होत जाणार आहे. कारण शहरातील रस्त्यांवर दररोज शेकडो नवीन वाहनांची भर पडत असते. वसई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील नोंदीनुसार वसईसह पालघर जिल्ह्य़ात दरदिवशी सरासरी सव्वादोनशे नवीन वाहने येत असतात. २०१६ या वर्षांत तब्बल ७८ हजार नव्या वाहनांची भर पडलेली आहे. या उदंड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, ध्वनिप्रदूषण, पार्किंगची अडचण आदी अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. वाढती वाहनसंख्या डोकेदुखी बनत चालली आहे.

पालघर जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वी ठाण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय होते. २०११ पासून विरार पूर्वेच्या चंदनसार येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले. वसईसह पालघर जिल्ह्य़ातील आठ तालुक्यांचा कारभार या केंद्रातून चालवला जातो. पालघर जिल्ह्य़ातील आठ तालुक्यांतील वाहनांची नोंदणी या उपप्रादेशिक कार्यालयातून होत असते. वसई-विरार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे वर्षांला साधारण १८० कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळवून देते. त्यात दरवर्षी १ टक्का वाढच होत असते. या कार्यालयात ५ लाखांहून अधिक वाहनांची नोंद आहे. २०१६ या वर्षांत वसई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ७८ हजार १९० वाहनांची नोंद झाली. म्हणजे महिन्याला साडेसहा हजार वाहनांची नोंदणी होत होती. याचाच अर्थ दिवसाला सरासरी सव्वादोनशे वाहने रस्त्यावर आली आहेत. २०१५-२०१६ या आर्थिक वर्षांनुसार दिवसाला सरासरी २८० वाहने रस्त्यावर आली आहेत.

वाहनांच्या वाढत्या संख्येबाबत बोलताना वसई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांनी सांगितले की, वसई ‘आरटीओ’कडे पालघर जिल्ह्यातील आठ तालुके आली आहेत. तेथील सर्व वाहनांची नोंदणी आमच्याकडे होत असते. नोंदणी झालेली वाहने वसईच्या रस्त्यावर येतात. वसई, पालघर-बोईसर मोठे औद्य्ोगिक क्षेत्र आहे. तेथे मुंबई, ठाणे तसेच गुजरातमधील वाहने येत असतात. त्यांची गर्दी वेगळी असते.

अभय देशपांडे, वसई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

सुलभ कर्जाचे हप्ते, प्रतिष्ठा यामुळे लोक एकापेक्षा अधिक वाहने घेत असतात. परंतु ती ठेवायला पार्किंगची सोय नसते. यामुळे अनेकांची गैरसोय होते. वाहन पार्किंगची जागा असल्याशिवाय वाहने खरेदी करू नका.

–  शारदा राऊत, पोलीस अधीक्षिका, पालघर.