अर्थसंकल्प मांडताना व्यवस्थापनाची कबुली

कल्याण : आर्थिक आघाडीवर कसाबसा गाडा हाकणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाला यंदाच्या वर्षांत शहरातील वेगवेगळ्या भागांत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याची कबुली परिवहन व्यवस्थापनाने बुधवारी उपक्रमाचा अर्थसंकल्प मांडताना दिली. हा तोटा कोणत्या मार्गावर तसेच किती रकमेचा आहे याविषयी स्पष्ट माहिती देणे उपक्रमाने टाळले असले तरी यानिमित्ताने महापालिका हद्द तसेच आसपासच्या परिसरात होणाऱ्या वाहनकोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाचा सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प बुधवारी प्रशासनाने परिवहन समितीला सादर केला. उपक्रमाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे या अर्थसंकल्पात स्पष्ट होत असून कोणतेही नवीन विकासाचे सोंग घेण्याचा प्रयत्न या वेळच्या अर्थसंकल्पात प्रशासनाने केलेला नाही. सन २०१९-२० चा ६९.५ कोटी ४५ हजार रुपये जमेचा आणि ६६.८१ कोटी ४५ हजार रुपये खर्चाचा आणि दोन कोटी २४ लाख रुपये शिलकीचा सुधारित तर सन २०२०-२१ चा ९१ कोटी ३५ लाख ८६ हजार रुपये जमेचा आणि ८९ कोटी २५ लाख ८६ हजार रुपये खर्चाचा तसेच दोन कोटी १० लाख रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प बुधवारी परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके यांनी सभापती मनोज चौधरी यांना सादर केला.

केडीएमटी बसला असलेली समांतर खासगी, बेकायदा बस, जीपची वाहतूक परिवहन उपक्रमाला आर्थिक तोटय़ात घालत आहे. कल्याण, डोंबिवली, शिळफाटा परिसरातील रस्ते नियमित वाहतूक कोंडीने भरलेले असतात. त्याचा फटका केडीएमटी सेवेला बसतो आहे. केडीएमटीला बसचे कल्याण-भिवंडी, नवी मुंबई, पनवेल हे सर्वाधिक उत्पन्नाचे मार्ग आहेत. या मार्गावर सातत्याने वाहन कोंडी होत असल्याने प्रवासी भार अधिक  असूनही तासन्तास बस वाहतूक कोंडीत अडकत असल्याने तेवढे महसुली उत्पन्न परिवहनला मिळत नाही, असा सूर केडीएमटीकडून आळवण्यात येत आहे.

२१८ केडीएमटीच्या ताफ्यातील एकूण बस आहेत. यामध्ये १०० पूर्वीच्या बस, ११८ बस जेएनयूआरएम प्रकल्प दोनमधील आहेत. चालू आर्थिक वर्षांत १३७ बस प्रवासी वाहतुकीसाठी सोडण्याचे नियोजन आहे. सध्या केडीएमटीच्या ६० ते ७० बस प्रवासी वाहतूक करतात.

४०,००० प्रवासी केडीएमटी बसमधून रोज प्रवास करतात. या प्रवासी वाहतुकीतून उपक्रमाला दरमहा एक कोटी ४० लाख रुपये उत्पन्न मिळते.

३०.०४ कोटी चालू आर्थिक वर्षांत केडीएमटीला अपेक्षित उत्पन्न. यात प्रवासी भाडे, विद्यार्थी पास, विनातिकीट प्रवासी, प्रासंगिक करार यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे.

महत्त्वाच्या घोषणा

  • बसथांब्यावर उभ्या प्रवाशाला बसच्या वेळेची आगाऊ माहिती देणारी यंत्रणा बसवणार. यासाठी ३२ कोटींचा खर्च.
  •  डोंबिवलीतील खंबाळपाडा येथे परिवहन आगार विकसित करण्याचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले आहे. दुसऱ्या टप्प्यात कार्यशाळा विकसित करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.