अनेक ठिकाणी घरांचे नुकसान; दीड दिवस वीजपुरवठा खंडित

ठाणे : चक्रीवादळामुळे सोमवारी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे ठाणे जिल्ह्य़ाची अक्षरश: दैना उडाल्याचे चित्र आहे. सर्वाधिक पाऊस ठाणे शहर आणि मीरा-भाईंदर येथील उत्तन भागात झाल्याची नोंद झाली आहे. पाऊस आणि वादळामुळे १७२ घरांचे किरकोळ तर सहा घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ५००हून अधिक झाडे उन्मळून पडली. चाळीसपेक्षा अधिक वाहनांवर झाडे कोसळल्याने नुकसान झाले आहे. अनेक भागांत सोमवारी सकाळपासून खंडित झालेला विद्युत मंगळवारी उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता.

सोसाटय़ाचे वारे आणि पावसामुळे ठाणे शहरातील रस्त्याकडेला असलेली १५९ वृक्ष भुईसपाट झाले आहेत. मंगळवारीही या वृक्षांच्या फांद्या पदपथांवर ठिकठिकाणी पडलेल्या पाहायला मिळाल्या. आठ वाहनांवर वृक्ष कोसळून वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये सहा कार आणि दोन रिक्षांचा समावेश आहे. ठाणे शहरातील आठ घरांचे वृक्ष कोसळून नुकसान झाले. दिवा आणि मुंब्रा शहरात नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याने नाल्यातील पाणी रस्त्यांवर आले होते. मंगळवारीही अनेक ठिकाणी रस्त्यांवर कचरा आणि दरुगधी पसरली होती. भिवंडी शहरात सोमवारी रात्री उशिरापर्यंत २३ वृक्ष उन्मळून पडले. यात एका घराचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक घरे, वाहने, मालमत्तांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. १००हून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. इमारतींच्या छतांवरील पत्रे उडून इतर घरांवर पडल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. कल्याण-शिळफाटा रस्त्यावर वादळी वाऱ्याच्या दणक्याने तीन जाहिरात फलक कोसळले.   पलावा येथील चौकात फलक कोसळल्याने दोन जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नांदिवली भागात एका शाळेचे पत्र्याचे शेड उडून ते बाजूच्या घरांवर कोसळले. त्यामुळे घरांची पडझड झाली आहे. शहरातील मुख्य, गल्लीबोळातील रस्त्यांवर चारचाकी, दुचाकी वाहिन्यांवर पडल्याने सुमारे ३०हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमध्येही दोनशेहून अधिक वृक्ष उन्मळून पडले. अंबरनाथ तालुक्यात पाच घरांचे नुकसान झाले. येथील ५३ जणांना इतरत्र हलविण्यात आले, तर मुरबाड आणि शहापूर भागांतही २० घरांचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.