डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या गर्दीचा भार उचलणाऱ्या ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या या प्रकल्पासाठी ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळाने’ १७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. आतापर्यंत अडगळीत असलेल्या या स्थानकाचा कायापालट करण्याच्या या निर्णयामुळे डोंबिवलीची गर्दी काही प्रमाणात कमी करता येईल, असा विस्वास मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ठाणे लोकसत्ता’शी बोलताना दिली.
ठाकुर्ली रेल्वे स्थानक हा डोंबिवली शहराचा भाग आहे. या रेल्वे स्थानकाचा विकास करून डोंबिवली रेल्वे स्थानकातील गर्दीचा भार कमी करा, अशी मागणी गेली अनेक वर्षे या भागातील लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. चोळेगावचे स्थानिक नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी यासंबंधी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची सकारात्मक फळे आता मिळू लागली असून ठाकुर्ली स्थानकाचा चेहरा बदलण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

प्रकल्पातील सुविधा
’ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला लागून २७० मीटर लांबीचा नवीन निवासी फलाट (होम प्लॅटफॉर्म) बांधण्यात येणार.
’रेल्वे स्थानकातील कल्याण बाजूकडील फलाट निमुळता आहे. ही रुंदी वाढवून मूळ फलाटाएवढी करण्यात येणार.
’रेल्वे स्थानकाच्या कल्याण बाजुकडे पादचारी पूल बांधण्यात येणार. हा पूल म्हसोबानगर झोपडपट्टीतील संतवाडी भागात उतरवण्यात येणार आहे. त्यामुळे कांचनगाव, सर्वोदय नगर, नेतिवली टेकडी भागात राहणाऱ्या रहिवाशांना रेल्वे मार्गातून चालत जाण्याऐवजी पादचारी पुलावरून जाण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
’संतवाडीजवळ पुलावरच रेल्वे तिकीट खिडकी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवर जाण्यासाठी करावा लागणारा द्रविडीप्राणायाम कमी होणार.
’कांचनगाव भागात राहणाऱ्या नागरिकांना तिकीट काढण्यासाठी रेल्वे मार्गातून चालत किंवा म्हसोबानगर झोपडपट्टीला वळसा देऊन डोंबिवलीच्या दिशेने असलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवर जावे लागते. हा त्रास कमी होणार.
’पत्रीपूल ते ठाकुर्ली यादरम्यान रेल्वे मार्गाला वळण आहे. त्यामुळे या भागातील रेल्वे अपघातांची संख्या अधिक आहे. हा विचार करून या भागात रेल्वेने ३० मीटरच्या पादचारी पुलाबरोबर संतवाडीमध्ये सरकता जिना बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता ठाकुर्ली लोकलची मागणी
डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या गर्दीचा भार कमी करण्यासाठी ठाकुर्ली रेल्वे स्थानकात नवीन फलाट बांधण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ठाकुर्ली लोकल सुरू करावी. यामुळे ठाकुर्ली, एमआयडीसी, सर्वोदय नगर, नेतिवली, पत्रीपूल, चोळे, पेंडसेनगर भागातील नागरिक डोंबिवली रेल्वे स्थानकात जाण्याऐवजी प्रवासासाठी ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा रस्ता धरतील. ठाकुर्ली पूर्व भागात असलेल्या रेल्वेचा जिना खूप अरुंद आहे. तो विस्तारित करण्यात यावा. तसेच, ‘एमव्हीआरसी’कडून चार महिन्यांपासून ठाकुर्ली स्थानकात सुरू असलेली कामे संथगतीने सुरू आहेत. त्या कामाचा वेग वाढवण्यात यावा. वेळेत ही कामे पूर्ण करण्यात यावीत, अशा मागण्या आता प्रवाशांमार्फत करण्यात आल्या आहेत.
भगवान मंडलिक, कल्याण