मनुष्याला कायमच निसर्गाची ओढ असते. ही ओढ आपण आपल्या घरात, गॅलरीत, गच्चीत, जिन्यात, सोसायटीच्या आवारात, नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून पूर्ण करत असतो. पण झाडाची लागवड कशी करावी, त्याला किती व कधी पाणी द्यावे, त्याची निगा कशी राखावी, त्याचे कीड व रोग यांपासून संरक्षण कसे करावे? असे अनेक प्रश्न आपल्याला सतावत असतात. या लेखातून हीच माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू.
कुंडीमधील वनस्पतींना आवश्यक असलेले प्राथमिक घटक म्हणजे माती, पाणी व सूर्यप्रकाश. त्याचा विचार खालीलप्रमाणे-
१) माती- कुंडय़ा भरताना प्रथम तळाशी मोठे खापराचे, विटांचे तुकडे टाकावेत म्हणजे कुंडय़ांची भोके बुजणार नाहीत. नंतर माती भरताना माती ज्या प्रकारची असेल त्याप्रमाणे त्यात वाळू, शेणखत, राख, नारळाच्या शेंडय़ा, कोकोपीट (नारळाचा भुस्सा) किंवा लाकडाचा भुस्सा इ. मिसळावे लागते.
काळी माती असल्यास तिची पाणी निचऱ्याची क्षमता कमी असते. अशा मातीत थोडी वाळू, राख, लाकडाचा भुसा, इ. मिसळावे म्हणजे माती मोकळी राहून मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. तांबडी, पिवळी किंवा मुरमाड माती असल्यास तिची पाणीधारण क्षमता कमी असते किंवा ती निचऱ्याची असते, तसेच या मातीत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी अन्नद्रव्ये कमी प्रमाणात असतात, म्हणून पाणी धरून ठेवण्यासाठी व अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी या मातीत कोकोपीट, शेणखत, इ. मिसळावे लागते. साधारणपणे दोन भाग माती व एक भाग इतर घटक यांचे मिश्रण कुंडीत भरावे. कुंडीत झाड लावल्यानंतर त्यावर घरातील भाज्यांची देठे, फळांच्या साली यांचे आच्छादन करावे.
झाडांना माती ही आधारासाठी व वाढीसाठी अन्नघटक पुरवणारे माध्यम म्हणून लागते. घरातील भाज्यांची देठे, साली, वाया गेलेले अन्न, सोसायटीच्या झाडांची पडलेली पाने, उसाच्या गुऱ्हाळातील चिपाड या सर्वाचा उपयोग करून आपण झाडांसाठी उत्तम माती सहजपणे घरच्या घरी तयार करू शकू. सर्व सेंद्रिय घटकांचे कुजल्यावर मातीमध्ये रूपांतर होते. यात पाण्याचा ओलावा धरून ठेवण्याची क्षमता व अन्नद्रव्ये उत्तमप्रमाणे असतात.
२. पाणी – वनस्पतींना पाणी किती लागते, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. वनस्पतींच्या मुळांना ओलावा लागतो, पाणी नाही. आपल्याकडील झाडे जास्त पाण्यामुळे मरतात. कुंडीतील पाण्याचा निचरा झालाच पाहिजे व मातीत योग्य ओलावा टिकून राहिला पाहिजे. कुंडीमधून पाणी बाहेर येत असेल तर आपण जास्त पाणी घालत आहोत हे लक्षात घ्या. झाडांच्या मुळांची कार्यक्षमता मातीत असलेल्या घटकांच्या प्रमाणावर अवलंबून असते. मातीमध्ये ४५ टक्के खनिजे माती, टक्के सेंद्रिय कर्ब घटक, २५ टक्के हवा व २५ टक्के पाणी असे प्रमाण आदर्श समजले जाते. या अवस्थेतच मुळांची कार्यक्षमता उच्च असते. यामुळे योग्य प्रमाणात मातीत ओलावा असणे व टिकवणे हे झाडे वाढण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. फक्त कमळासारख्या वनस्पती पाण्यातून ऑक्सिजन घेऊन स्वत:चा विकास करू शकतात.
या जास्तीच्या पाण्यामुळे जशी झाडाची वाढ नीट होत नाही त्याचप्रमाणे जास्त पाण्यामुळे झाडांचे रोग वाढतात. त्या मातीमध्ये बुरशीजन्य रोग वाढतात. झाडे अशक्त होतात. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून झाडांना योग्य पाणी देणे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कमी पाण्यापेक्षा जास्त पाण्यामुळेच झाडे मरण्याचे प्रमाण वाढते.
३. सूर्यप्रकाश : प्रत्येक वनस्पतीला आवश्यक असणारे उन्हाचे प्रमाण वेगवेगळे असते.
काही वनस्पतींना तीव्र ऊन आवश्यक असते तर काही सावलीतसुद्धा
चांगल्या वाढतात. आपण जेथे झाड ठेवण्याचे ठरविले आहे तेथे किती ऊन असते. वर्षांत सूर्याचे उत्तरायण दक्षिणायनप्रमाणे आपल्या घरात येणाऱ्या उन्हाचा कालावधी बदलत असतो. उन्हात येणारी झाडे सावलीत व सावलीत वाढणारी झाडे उन्हात ठेवली गेली तर ती योग्य पद्धतीने वाढत नाहीत. तसेच त्यांना फळे-फुले येत नाहीत.
ती मरण्याची शक्यतासुद्धा वाढते.
४. आवड आणि सवड : झाडे लावताना आपण त्यासाठी दिवसातील किती वेळ देऊ शकतो, आपल्याकडे झाडे ठेवण्यासाठी (उन्हाप्रमाणे) किती जागा आहे. त्या जागेत किती कुंडय़ा राहू शकतात, हे पाहून त्याप्रमाणे झाडे किती लावावीत हे ठरवावे. झाडांची संख्या ठरल्यानंतर त्यात आपल्या आवडीनुसार व गरजेनुसार फुलांची आणि सुगंधी, औषधी, नुसती विविध रंग व आकाराच्या पानांची इत्यादी वेगवेगळ्या उद्देशांप्रमाणे झाडांची निवड करावी.
राजेंद्र भट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree planting tips
First published on: 26-02-2015 at 12:14 IST