कल्याण, उल्हासनगरमध्ये बीएमएमच्या परीक्षेतील प्रकार; विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची भीती

निकालातील गोंधळावरून चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या घोळाचा आणखी एक नमुना समोर आला आहे. बीएमएमच्या बुधवारपासून सुरू झालेल्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला कल्याणमधील एका महाविद्यालयाने वेगळीच प्रश्नपत्रिका दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. या विषयाची प्रश्नपत्रिका इतर महाविद्यालयांमध्ये वेगळी दिली गेल्याने या महाविद्यालयात परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

विविध गोंधळांमुळे गेली काही वर्षे कायम चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या बीएमएम अभ्यासक्रमाची सहाव्या सत्राची परीक्षा बुधवारपासून सुरू झाली.त्यात पत्रकारिता विषयात पहिला पेपर ‘वृत्तपत्र कायदे आणि नीतिमूल्ये’ हा होता. या परीक्षेसाठी उल्हासनगर, कल्याण ग्रामीणमधील महाविद्यालयाचे काही विद्यार्थी उल्हासनगरच्या तर काही विद्यार्थी कल्याणच्या सेठ हिराचंद मुथा महाविद्यालयात परीक्षेसाठी होते. सकाळी ११ वाजता ‘वृत्तपत्र कायदे आणि नीतिमूल्ये’ या पेपरला सुरुवात झाली. मात्र पेपर संपल्यानंतर दोन महाविद्यालयांत परीक्षेस गेलेले विद्यार्थी एकत्र आल्यानंतर त्यांनी आपापल्या प्रश्नपत्रिका पडताळल्यानंतर त्यांना धक्का बसला. कारण कल्याणमधील सेठ हिराचंद मुथा महाविद्यालयातील प्रश्नपत्रिका ही इतर महाविद्यालयांमध्ये दिलेल्या प्रश्नपत्रिकेपेक्षा वेगळी होती. त्यातील प्रश्नही वेगळे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यांनी आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना ही बाब सांगितली. मात्र प्रश्नपत्रिका आणि पेपर संपून बराच वेळ झाल्याने त्यांना याची तक्रार करता आली नाही. पुन्हा परीक्षा द्यावी लागते की काय, या प्रश्नाने आता विद्यार्थ्यांना ग्रासले आहे. याबाबत काही प्राध्यापकांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ही जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचा अभ्यासक्रम सारखाच आहे, मात्र प्रत्येक प्रश्नपत्रिकांना विशिष्ट कोड दिलेला असतो. या दोन्ही कोडमधील फरक आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्येही संभ्रमाचे वातावरण होते.

महाविद्यालयांतील विद्यार्थी एकत्र आल्यानंतर प्रकार उघडकीस

‘वृत्तपत्र कायदे आणि नीतिमूल्ये’ या परीक्षेसाठी उल्हासनगर, कल्याण ग्रामीणमधील महाविद्यालयाचे काही विद्यार्थी उल्हासनगरच्या तर काही विद्यार्थी कल्याणच्या सेठ हिराचंद मुथा महाविद्यालयात परीक्षेसाठी होते. पेपर संपल्यानंतर दोन महाविद्यालयांत परीक्षेस गेलेले विद्यार्थी एकत्र आल्यानंतर त्यांनी आपापल्या प्रश्नपत्रिका पडताळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कल्याणमधील सेठ हिराचंद मुथा महाविद्यालयातील प्रश्नपत्रिका ही इतर महाविद्यालयांमध्ये दिलेल्या प्रश्नपत्रिकेपेक्षा वेगळी होती. त्यातील प्रश्नही वेगळे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले.

आम्हाला जो प्रश्नपत्रिकेचा कोड आला त्याच प्रश्नपत्रिका आम्ही विद्यार्थ्यांना दिल्या. विद्यापीठाकडून महाविद्यालयांना नोटिफिकेशन येत असते. त्यात कोणती प्रश्नपत्रिका, त्याचा अभ्यासक्रम याची नोंद असते. ते पत्र न आल्याने आम्हाला जे कोड आले, त्या प्रश्नपत्रिका दिल्या. याबाबत विद्यापीठाशी बोलून प्रश्न सोडवला जाईल,   – श्रुती वायकर, प्राचार्य, सेठ हिराचंद मुथा महाविद्यालय, कल्याण