बदलापूर : उल्हास नदीला आलेल्या पुराचा फटका बदलापूर, कल्याण तालुक्यातील गावे आणि कल्याण शहराच्या काही भागाला बसला. गुरुवारी मध्यरात्रीपासूनच उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे बदलापूर-कर्जत राज्यमार्ग आणि रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले होते. पुराच्या पाण्यामुळे बदलापूर, शहाड, कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा आणि रायते या नदीकाठच्या गावांतील तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शहाड, टिटवाळा येथील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. या पुरात विविध ठिकाणी अडकलेल्या शंभरहून अधिक जणांची राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व अग्नीशमन दलाच्या मदतीने सुटका करण्यात आली.

बुधवारी सायंकाळनंतर लोणावळा, खंडाळा, कर्जत आणि नेरळ या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासूनच उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. गुरुवारी पहाटेच्या सुमारास शहरातील रमेशवाडी, बॅरेज रस्ता, हेंद्रेपाडा, मोहनानंद नगर, शनीनगर, खरवई या भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. सायंकाळी अनेक ठिकाणी पावसाचे पाणी ओसरू लागले. कल्याण तालुक्यातील रायते, कांबा, वरप आणि म्हारळ या गावांमध्ये उल्हास नदीच्या पुराचे पाणी शिरले. त्यामुळे अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात येणाऱ्या शहाड, मोहने रस्ता, टिटवाळा या भागात अनेक रहिवासी संकुलांमध्ये पुराचे पाणी शिरले. डोंबिवलीतील खाडी किनारच्या भागातही पाणी शिरले होते. वालधुनी नदी किनारच्या कल्याण पूर्वेच्या भागातही अनेक घरांत पाणी शिरले होते. पाण्यात अडकलेल्या शंभरहून अधिक नागरिकांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि स्थानिकांनी वाचवले.  उल्हास नदीला पूर आल्याने बदलापूर वांगणीदरम्यानचे रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास रुळावर पाणी आल्याने मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस मध्यरात्री बाराच्या सुमारास बदलापूर स्थानकात थांबवण्यात आली होती. गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ही एक्सप्रेस याच ठिकाणी थांबून होती. बदलापूर-कर्जत राज्यमार्ग आणि कल्याण अहमदनगर राज्यमार्ग पाण्याखाली गेल्याने  वाहतूक ठप्प झाली होती.

ठाण्यातही पावसाच्या जोरदार हजेरीने विविध ठिकाणी पाणी साचले होते. दिवा परिसरात पाणी साचल्याने काही नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले. तर मुंब्रा परिसरात चार वृक्ष पडून सहा घरांचे नुकसान झाले. बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका भिवंडीलाही बसला.

वीज, पाणीपुरवठा खंडित

उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे बदलापूर, मोहने, मोहिली उदंचन केंद्रांमध्ये पाणी शिरल्याने बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली आणि ग्रामीण भागातील विविध गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तर बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि अनेक गावांचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.

रेल्वे वाहतूक पूर्ववत

पावसामुळे वांगणी, उंबरमाळी, खडवली ते वाशिंद पट्टयात रुळांखालील खडी वाहून गेल्याने सकाळपासून सीएसएमटी ते अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळापर्यंतच वाहतूक सुरू होती. मात्र रुळांची कामे पूर्ण के ल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास सीएसएमटी ते कसारा व कर्जत मार्ग पुन्हा पूर्ववत झाला. तर कर्जत ते लोणावळा दरम्यानही काम पूर्ण के ल्यानंतर या मार्गावरील डाऊन मार्गही सुरु करण्यात आला.