कल्याण-डोंबिवलीचा एक तारांकित शहरात समावेश

बदलापूर : स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशातील स्वच्छतेच्या विविध निकषांवर केलेल्या पाहणी अभ्यासात ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहर अनुत्तीर्ण ठरले. घाणेरडे शहर असा शिक्का बसलेली कल्याण, डोंबिवली ही शहरे कशीबशी उत्तीर्ण झाली आहेत. या अभियानात ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईने सलग दुसऱ्या वर्षी पंचतारांकित शहराचा मान पटकाविला आहे. ठाणे, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर आणि अंबरनाथ या जिल्ह्यांतील इतर शहरांना तीन तारांकित शहरांच्या यादीत स्थान मिळाले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेला एक तारांकित शहरांच्या यादीत कसेबसे स्थान मिळविता आले आहे. उल्हासनगरला मात्र ६० टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहेत.

स्वच्छ भारत अभियानात घनकचरा व्यवस्थापनात चांगली कामगिरी करणाऱ्या महापालिका, नगरपालिकांना केंद्र शासनाकडून तारांकित शहरांची नामांकने देण्यात येतात. जानेवारी महिन्यात पार पडलेल्या सर्वेक्षणाचा निकाल केंद्र सरकारकडून मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात देशातील सहा पंचतारांकित शहरांत ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई या एकमेव शहराला स्थान मिळवता आले आहे. तर इतर शहरांची कामगिरी सर्वसाधारणच असल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षांत ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, भिवंडी निजामपूर, उल्हासनगर या महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव बदलापूर या नगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अनेक प्रयत्नांनंतरही या शहरांमधील स्वच्छतेचा आणि कचरा विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या तारांकित शहरांच्या यादीत ठाणे शहर तीन तारांकित शहरांच्या यादीत आहे. या यादीत भिवंडी निजामपूर महापालिकेने मिळवलेले स्थान सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. शहरातल्या कचराभूमीचा प्रश्न कागदोपत्री सुटला असली तरी बेकायदा कचराभूमी असलेल्या अंबरनाथ शहरालाही तीन तारांकित शहरांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

मीरा भाईंदर महापालिकाही या यादीत समाविष्ट आहे. तर कडोंमपाची या आघाडीवर घसरण सुरू असली तरी किमान एक तारांकित शहरांच्या यादीत या शहरांनी स्थान मिळविले