ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण; पहिल्या टप्प्यात ३० टक्के लोकसंख्येला लस

ठाणे महापालिकेसह संपूर्ण जिल्ह्यात करोना लसीकरणाच्या सज्जतेची सराव फेरी शुक्रवारी पार पडत असतानाच, पुढील आठवडय़ात मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर ठाणे शहरात लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह सुमारे २५ ते ३० टक्के लोकसंख्येला लस मिळू शकणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात मकरसंक्रांतच्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार असून त्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी शुक्रवारी समितीच्या बैठकीत दिली. त्यानंतर या मोहिमेबाबत महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांनी सविस्तर माहिती सदस्यांना दिली. शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास असून त्यापैकी २५ ते ३० टक्के नागरिकांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. त्यामध्ये आरोग्य अधिकारी कर्मचारी, पोलीस विभाग, ५० वर्षांवरील नागरिक, अतिजोखीम गटातील रुग्ण यांचा समावेश आहे. शहरातील १६ आरोग्य केंद्रांवर ही लस दिली जाणार आहे. या ठिकाणी लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी प्रतीक्षा कक्ष, नोंदणी कक्ष आणि लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्ष आदी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. या सर्वाना मोफत लस दिली जाणार असून राज्य शासनाच्या आदेशानुसार लसीकरणाचा पहिला टप्पा १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे, असे त्यांनी सांगितले. सर्वच ठिकाणी लशीच्या साठवणुकीसाठी फ्रीजरची व्यवस्था करण्यात आली असून मध्यवर्ती ठिकाणीही अतिरिक्त लस ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिला टप्पा झाल्यानंतर दुसरा टप्पा २८ दिवसांनंतर सुरू केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सज्जता सराव निर्विघ्न

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारी करोना लसीकरणाची सराव फेरी घेण्यात आली. ठाणे आणि भिवंडी महापालिका क्षेत्र, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय, शहापूर उपजिल्हा रुग्णालय, दिवा-अंजूर प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी २ केंद्रांवर तर कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा भाईंदर येथे प्रत्येकी १ केंद्रांवर चाचणी घेण्यात आली. याठिकाणी प्रत्येकी २५ जणांना मोबाइलवर संदेश पाठवून लसीकरणासाठी बोलाविण्यात आले होते. या सराव फेरीत लाभार्थी नोंदणी, लसीकरणाचे नियोजन, प्रत्यक्ष लसीकरणासाठी लागणाऱ्या लशींच्या वितरणाच्या नोंदी, लाभार्थ्यांला लस दिल्याची नोंद, लसीकरणानंतर पुन्हा नोंद आणि लाभार्थीला लस दिल्याचे प्रमाणपत्र या सर्व बाबींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. प्रत्यक्ष लसीकरण प्रक्रियेमधील सर्व बाबी यावेळी राबविण्यात आल्या. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करोना लसीकरण सराव फेरी पार पडली.

ठाणे महापालिकेने घोडबंदर रोडवरील रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र येथे सराव फेरी घेतली. भिवंडीतही कोंडाची वाडी येथील शाळा क्रमांक ७० मध्ये सराव फेरी घेण्यात आली.