करोना प्रसाराची भीती; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

वसई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी टाळेबंदी जारी केलेली असताना असंघटित सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या संभाव्य करोना संक्रमणाच्या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात अनेक निवासी संकुलांमध्ये कोणत्याही सुरक्षा उपायांशिवाय साफसफाईचे काम करणाऱ्या  सफाई कर्मचाऱ्यांमुळे करोना प्रसाराची भीती व्यक्त केली जात आहे.

वसई—विरार शहरात शेकडो असंघटित सफाई कामगार विविध खासगी कंपन्या, दुकाने, व्यापारी आस्थापने आणि निवासी संकुलांमध्ये सफाईचे काम करतात. करोनाच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण देशात टाळेबंदी असली तरी सफाई कर्मचारी विविध निवासी संकुलांमध्ये साफसफाई आणि कचरा गोळा करण्याच्या कामासाठी जातात. हे सफाई कर्मचारी निवासी संकुलातील प्रत्येक सदनिकेपर्यंत मोठी कचरापेटी सोबत नेतात. सदनिकेतील कचऱ्याचा  डबा स्वत:कडील कचरापेटीत रिकामी करतात. त्यानंतर संकुलाच्या आवारात झाडू मारून तिथल्या कचऱ्याची विल्हेवाट लावतात. त्यानंतर दुसऱ्या निवासी संकुलात जातात. निवासी संकुलातील जिने, उद्वाहक, सदनिकेच्या दरवाजावरील बेल इत्यादींशी या कर्मचाऱ्यांचा संपर्क येत असतो.

अशाप्रकारे एक सफाई कर्मचारी दिवसभरात अनेक सदनिकांमधील कचरा गोळा करत असल्यामुळे तो शेकडो माणसांच्या आणि वस्तुंच्या संपर्कात येतो. वसई—विरार शहरात असे असंख्य सफाई कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दक्षता बाळगली जात नाही वा निवासी संकुलाकडून त्यांना आरोग्यविषयक सुरक्षेच्या सोयी पुरविल्या जात नाहीत. त्यांच्याकडे तोंडाभोवतीचे आवरण (मास्क), जंतुनाशके, हातमोजे काहीही दिले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

दरम्यान, वसई—विरार शहरातील गृहनिर्माण संस्थांमध्ये सफाईकरिता जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या त्या संस्थांनी सुरक्षाविषयक वस्तूंचा पुरवठा करायचा आहे. तसेच निर्देश गृहनिर्माण संस्थांच्या सचिवांना दिल्याचे स्वच्छता निरीक्षक वसंत  मुकणे यांनी सांगितले.

वसईच्या भागात पिकविण्यात आलेला भाजीपाला  सध्या जागीच पडून आहे.

काशी मिरा आणि उत्तन परिसरातील भाजी बाजारात मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे हे बाजार पूर्णत: बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तसेच इतर सुरु असलेल्या बाजारातही गर्दी आढळून आल्यास ते  बाजार बंद करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. मिरा भाईंदर शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे  पालिका प्रशासनाकडून अत्यावश्यक वस्तूच्या खरेदी करीता  ठिकठिकाणी बाजाराची निर्मिती करण्यात आली आहे.  परंतु या बाजारात मोठय़ा प्रमाणात नागरिक गर्दी करत असल्याचे आढळून येत आहे. यात उत्तन आणि काशी मिरा परिसरात सुरु असलेल्या बाजारात नियमांना डावलून अनेक नागरिक भाजी पाला खरेदी करत आहेत.

लवकरच आरोग्य सर्वेक्षण

वसई : वसई-विरार शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेच्या वतीने आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांची आरोग्यविषयक माहिती गोळा करण्याचे काम केले जात आहे.  आरोग्यविषयक माहिती ऑनलाइन माध्यमातून जमा केली जात आहे.  गेल्या महिनाभरात एखाद्या व्यक्तीने कुठे कुठे प्रवास केला त्याची माहिती, परदेश प्रवासाचा तपशील, सर्दी-खोकला वा तसेच श्वास घेण्यास त्रास आणि इतर आजार असल्यास त्याची माहिती पालिकेच्या ऑनलाइन संकेतस्थळावरून नोंदविण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. यात ज्या व्यक्तीत ‘करोना’च्या संदर्भातील लक्षणे आढळून येतील अशा रुग्णांची पालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून घरोघरी जाऊन योग्य ती तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.