मास्क, हातमोजे रस्ते, सार्वजनिक ठिकाणी फेकले जात असल्याने करोनाची भीती

वसई : करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या मुखपट्टय़ा, हातमोजे या वस्तू कचराकुंडीत न टाकता रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी सर्रास फेकून दिल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र यामुळे करोना संसर्गाचा धोका पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

करोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद बनू लागले आहे. त्यातच आता करोना विषाणूला रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मुखपट्टय़ा, हातमोजे या साहित्यांचा वापर मोठय़ा प्रमाणावर होऊ  लागला आहे. मात्र या साहित्याचा वापर करून झाल्यावर हे साहित्य कचराकुंडीत टाकण्याऐवजी काही जण रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फेकत असल्याचे दिसून आले आहे. याचा विपरीत परिणाम आजूबाजूने प्रवास करणाऱ्या नागरिकांवर होण्याची शक्यता आहे.

तसेच कचऱ्यात फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर साहित्य गोळा करण्याचे काम वसई-विरार शहरातील विविध भागांत कचरा वेचणारे नागरिक करीत असतात. त्यातून मिळणाऱ्या कमाईवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु आता करोनाच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याच्या ठिकाणी मुखपट्टय़ा, हातमोजे फेकून दिले जात असल्याने नकळत त्यांचा संपर्क या वस्तूंसोबत आल्यास त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

महामार्गालगतही कचरा

वसई पूर्वेतील भागातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतही अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या सुमारास कचरा टाकला जात आहे. सध्या या कचऱ्यात मुखपट्टय़ा, हातमोजे टाकून दिले असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे महामार्गालगत कचरा वेचणाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.