01 October 2020

News Flash

धरणांत जलभरणा

बारवी, भातसा, आंध्र धरणांच्या पाणीसाठय़ात वाढ

बारवी, भातसा, आंध्र धरणांच्या पाणीसाठय़ात वाढ

बदलापूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्य़ात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विविध प्रकारे नुकसान झाले असतानाच, दुसरीकडे मात्र जिल्ह्य़ातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरण आणि नदी क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. बारवी, भातसा आणि आंध्र धरणासह उल्हास नदीच्या पात्रातील पाणीसाठा वाढला असून यामुळे जिल्ह्य़ाला काहीसा जलदिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

यंदा आतापर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहिले होते. त्यातही धरणक्षेत्रांत अत्यल्प पावसाची नोंद झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कसर भरून काढण्यास सुरुवात केली आहे. बारवी धरणक्षेत्रात गेल्या दोन दिवसांत १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून या धरणात ३ ऑगस्ट रोजी ४८.९९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र गुरुवारी धरणातील पाणीसाठा ५३.०३ टक्क्यांवर पोहोचला. तीन दिवसांत १४ दशलक्षघनमीटर पाणीसाठय़ाची नोंद बारवी धरणक्षेत्रात झाली आहे. भातसा धरणात गेल्या २४ तासांत ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाणीसाठा ५४७.६९ दशलक्ष घनमीटरवर पोहोचला आहे. धरणातील पाणीसाठय़ात पाच टक्क्य़ांची वाढ होऊन तो ५८.१७ टक्क्य़ांवर पोहोचला आहे.

ठाणे जिल्ह्य़ाच्या पाणीपुरवठय़ात योगदान देणाऱ्या आंध्र धरणातही गेल्या तीन दिवसांत समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. धरणात गुरुवारी ५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाणीसाठय़ात १४ दशलक्ष घनमीटरची वाढ होऊन पाणीसाठा १२६ दशलक्ष घनमीटरवर पोहचला आहे. तीन दिवसांपूर्वी धरणात ३३.१९ टक्के पाणीसाठा होता. मात्र, पावसामुळे त्यात वाढ होऊन तो ३७.२८ टक्के इतका झाला आहे. तर मध्य वैतरणा धरणातही गेल्या २४ तासांत २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या धरणातील पाणीसाठा ८०.७५ दशलक्ष घनमीटरवर पोहचला होता.

उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ

गेल्या दोन दिवसांपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ात सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. कर्जतहून बदलापूरकडे वाहणाऱ्या उल्हास नदीतील पाणी पातळी गुरुवारी कर्जतमध्ये ४५ मीटरवर पोहचली होती. कर्जतमध्ये उल्हास नदीची धोका पातळी ४८.७७ मीटर इतकी असून इशारा पातळीपर्यंत पोहचण्यासाठी अवघे ३ मीटर शिल्लक आहेत. तर बदलापूर शहरातही उल्हास नदीची पाणी पातळी १४.२० मीटपर्यंत पोहोचली आहे. बदलापुरात नदीची धोकापातळी १७ मीटर असून इशारा पातळी १६ मीटर आहे. बदलापुरात गेल्या २४ तासांत ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणांची वाढलेली पाणी पातळी

धरण                  ३ ऑगस्ट                 ६ ऑगस्ट                     धरणाची क्षमता

(दल.घ.)

भातसा               ५३.६५                        ५८.१७                               ९४२.१०

बारवी                  ४८.९९                       ५३.०३                              ३३८.८४

आंध्रा                  ३३.१९                       ३७.३८                               ३३९.१४

मध्य वैतरण      ३४.९१                       ४१.७३                               १९३.५३

(आकडेवारी टक्क्य़ांमध्ये)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 2:10 am

Web Title: water level in barvi bhatsa andhra dams increased due to heavy rain
Next Stories
1 रस्त्यांची चाळण
2 श्रावणातही सामिष आहाराकडे कल
3 सार्वजनिक गणेशोत्सव अडीच दिवसांचा
Just Now!
X