पंधरवडय़ापुर्वी ठाण्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या सहा महिन्यात ठाणे वायफाय युक्त शहर असेल, अशी घोषणा केली. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासंबंधीचा सविस्तर आराखडा यापुर्वीच तयार केला होता. मुख्यमंत्र्यांनी तो जाहीर केला आणि या घोषणेचे ठाण्यातील राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत. मुख्यमंत्री आणि आयुक्तांनी जाहीर केल्याप्रमाणे ठाणे शहर वायफाय युक्त झाले तर अशाप्रकारची सुविधा पुरविणारे ठाण्यातील ते पहिले शहर ठरणार आहे.

ही घोषणा प्रत्यक्षात येण्यास आणखी सहा महिने आहेत. म्हणजेच ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा प्रत्यक्षात येईल, असे गृहीत धरले तर त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांकडून होईल हे लक्षात आल्याने महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या पोटात आतापासूनच गोळा आला आहे. मुंबई महानगर क्षेत्राचा अविभाज्य भाग असलेल्या कल्याण डोंबिवली, नवी मुंबई यासारख्या शहरांमध्ये प्रभाग स्तरावर काही इच्छुक उमेदवारांनी प्रभागापुरते ‘मोफत’ वायफाय पुरविण्याचे प्रयोग करुन दाखविले आहेत. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही विधानसभा निवडणुकीपुर्वी रेल्वे स्थानकात अशी सुविधा बसवून तरुणाईला आकर्षीत करण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. ईंटरनेट वेडय़ा तरुणाईला केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात येणारा हा प्रयोग ठाण्यात मोठय़ा स्तरावर राबविला जात आहे हे विशेष. त्यामुळे एरवी गटर, वॉटर, मीटर या मुद्दयांपर्यत मर्यादीत रहाणारा राजकीय प्रचार आता वायफाय, इंटरनेट, सीसी टिव्ही अशा तंत्रज्ञान आधारित मुद्दयाभोवती स्थिरावू लागल्याचा हा बदल आहे.
नुकत्याच झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत स्मार्ट सिटीचा मुद्दा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला होता. शहर स्मार्ट होणार म्हणजे नक्की काय याविषयी पुरेशी स्पष्टता नसतानाही भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मोठय़ा खुबीने याच मुद्दयाभोवती प्रचार फिरत राहील याची काळजी घेतली. २४ तास पाणी, चांगले रस्ते या नेहमीच्या मुद्दयांभोवती फिरणारा प्रचार पुढचा टप्पा गाठत आहे या निमीत्ताने पुन्हा एकदा दिसून आले. हे होत असताना मोफत वायफाय, इंटरनेट वापर केंद्राचे काही प्रयोग करत प्रभाग स्तरावर मतदारांना आकर्षित करण्याचे ‘प्रयोग’ प्रभाग स्तरावर केव्हाच सुरु झाले होते. लोकसभा निवडणुकीत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत यशस्वी होता येते हे लक्षात आल्याने विधानसभेत काही उमेदवारांनी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोफत इंटरनेटसारख्या क्लुप्त्या लढविण्याचा प्रयत्न केला. काही वर्षांपुर्वी मोफत केबल सेवा हे प्रचाराचे आकर्षण ठरले होते. कल्याण पुर्व विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांच्या निवडणुकीतील यशात मोफत केबल सेवेचा प्रचार निर्णायक ठरल्याचा इतिहास आहे. यंदा वाशी, ऐरोली रेल्वे स्थानकात मोफत वायफाय सेवा सुरु करुन राष्ट्रवादीचे स्थानिक उमेदवारांनी नवी मुंबईतील तरुण मतदारांचे लक्ष्य केंद्रीत करण्याचा प्रयत्त केला होता. मुंब््रयात जितेंद्र आव्हाड यांनीही हा प्रयोग यशस्वीपणे राबविला. काही प्रभाग आणि विधानसभा मतदारसंघांपुरते राबविले जाणाऱ्या या प्रयोगांची मोठी आवृत्ती महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात पहायला मिळणार आहे. ठाणेच नव्हे तर कळवा, मुंब््रयात जेथे मोबाईल सेवा उपलब्ध आहे तेथे महापालिकेने उपलब्ध करुन दिलेले मोफत वायफाय पोहचणार आहे. चार वर्षांपुर्वी सत्ताधारी शिवसेनेच्या वचननाम्यात हा मुद्दा अग्रभागी होता. त्यामुळे या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी म्हणून शिवसेनेकडून होईलच, शिवाय भाजपही मागे रहाणार नाही. पालकमंत्री आणि शिवसेनेचे ठाण्यातील प्रमुख नेते एकनाथ िशदे यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वॉटर, मीटर ते वायफाय प्रचाराचा हा प्रवास अनेक अंगांनी रंजक ठरणार आहे.