ठाणे : स्टेम प्राधिकरण उल्हास नदीच्या पात्रातील पाणी शहाड येथून उचलते आणि त्याचा ठाणे तसेच आसपासच्या शहरांत पुरवठा करते. शहाड भागात सोमवारी पहाटे ३.५० वाजता विद्युत यंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला. दोन ते तीन तासांच्या दुरुस्तीकामानंतर या भागाचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाला. तोपर्यंत स्टेमकडून शहराला होणारा पाणीपुरवठा ठप्प होता. यानंतर पाणीपुरवठा सुरू  झाला असला तरी स्टेमचे पाणी नियोजन बिघडल्यामुळे ठाणे शहराला २० दशलक्ष लिटर इतका कमी पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे ठाणे शहरातील पाण्याचे वेळापत्रक कोलमडले असून शहरात पुढील २४ तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

दक्षतेचा इशारा

ठाणे : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. ठाणे शहरात सोमवारी ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या दोन दिवसांतही मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत  झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. तसेच आपत्तीच्या परिस्थितीत मदतीसाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले आहे.