यंदाच्या वर्षी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तीना मागणी

वसई : यावर्षीच्या गणेशोत्सव सणावर करोनाचे सावट आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. अवघ्या दहा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्याने वसईच्या विविध चित्रशाळेत गणेश मूर्त्यां तयार करण्याच्या व त्यांना रंगरंगोटी करण्याच्या कामांना वेग आला आहे. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी पर्यावरण पूरक गणेशमूर्तीचा पर्याय समोर आला असल्याने यंदाच्या वर्षीही पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना सर्वाधिक मागणी येऊ लागली आहे.

गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेश मूर्त्यांंची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र या मूर्तीचे पाण्यात विसर्जन केल्या नंतर त्याचे लवकर विघटन होत नाही. मूर्तीला देण्यात येत असलेल्या रासायनिक रंगामुळे विसर्जनानंतर पाणी प्रदूषित होत असते. यामुळे पाण्यातील जैविक घटकांना याचा धोका निर्माण होत असतो. त्यामुळे पर्यावरण पूरक अशा गणेश मूर्तींची मागणी होऊ लागली आहे. या मागणीमुळे कलाकारांनी ही पर्यावरणपूरक अशा गणेशमूर्तींना प्राधान्य देऊन पर्यावरणपूरक शाडू मातीपासून तयार केलेल्या व कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्ती साकारण्यास सुरुवात केली आहे.

दिवसेंदिवस पर्यावरणपूरक गणेशमूर्त्यांंच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. शाडू मातीपासून तयार करण्याचे काम हे अतिशय किचकट असल्याने साधरण दोन फुटांची मूर्ती तयार करण्यास दोन ते अडीच दिवसांचा कालावधी लागतो यासाठी आधीच अशा मूर्त्यांंची कामे हाती घ्यावी लागतात. मात्र तरीही यावर्षी शाडू मातीच्या मूर्त्यांंची मागणी दुपटीने वाढली असल्याचे  त्रिमूर्ती आर्टस् चंद्रपाडा येथील कलाकार  दिनेश पाटील यांनी सांगितले आहे. तर यावर्षी करोनामुळे अनेक घरगुती गणपतींचे घरच्या घरी विसर्जन करण्यात येणार असल्याने मातीच्या मूर्त्यांंची मागणी वाढली असल्याचे मूर्ती कलाकारांनी सांगितले आहे.

मूर्त्यांची उंची कमी केल्याने उत्पन्नावर परिणाम

यावर्षी करोनाचे संकट असल्याने गणेश मूर्त्यांंची उंची ही कमी करण्यात आली आहे. गणेशमूर्त्यांची उंची कमी करण्यात आल्याने त्याचा परिणाम हा कलाकारांच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे. कारण दरवर्षी सार्वजनिक मंडळे ७ ते ८ फुटांची मूर्ती घेतात तर घरगुती मूर्ती साधारण दोन ते अडीच फुटांची घेत असतात. त्यातून कलाकारांना चांगले आर्थिक उत्तपन्न मिळत असते. तर दुसरीकडे काही कलाकार हे मूर्त्यांंना हिरे लावणे व इतर सजावटीचे काम घेतात.  परंतु यावर्षी या मूर्त्यांंची उंची शासनाच्या नियमानुसार कमी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी दीड ते दोन फुटांच्या गणेश मूर्त्यांंचे बुकिंग केले आहे. त्यामुळे साहजिकच दरवर्षी मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा यावर्षीचे उत्पन्न कमी असेल असे मूर्ती कलाकारांनी सांगितले.