फेरीवाल्यांना अभय दिल्याने कारवाई
बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याशी सलगी करणाऱ्या फेरीवाला पथकाला कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनी कारवाईचा चांगलाच दणका दिला आहे. सोमवारी पथकातील २४८ कामगारांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात कल्याण, डोंबिवली, टिटवाळा पथकातील २२२ सफाई कामगार आणि २६ वाहन चालकांचा समावेश आहे.
शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी बेकायदा फेरीवाल्यांच्या मुद्दय़ावरून महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांना लक्ष्य केले होते. सत्ताधारी पक्षातील विश्वनाथ राणे, राजेश मोरे, रमेश म्हात्रे, वामन म्हात्रे यांनीही प्रशासनावर टीकेची झोड उठविली होती; तर दीपेश म्हात्रे, शैलेश धात्रक या सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी सभा तहकुबीची सूचना मांडत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची लक्तरे यावेळी सभागृहात मांडली. नगरसेवकांच्या टीकेचा प्रतिवाद करण्यास आयुक्तांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही अशक्य झाले होते. या टीकेमुळे अस्वस्थ झालेले आयुक्त ई. रवींद्रन यांनी अखेर या नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेत टिटवाळा, कल्याण, डोंबिवली प्रभागांमधील फेरीवाला हटाव पथकातील कामगारांच्या तडकाफडकी बदल्या केल्या.
महापालिकेच्या ग प्रभागातील दिलीप ऊर्फ बुवा भंडारी यांच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक बेकायदा फेरीवाले असल्याचे येथे सांगितले जाते. कल्याण रेल्वे स्थानक भागातील पथकातून भंडारी यांची नुकतीच डोंबिवलीतील ग प्रभागात बदली करण्यात आली आहे.
भंडारी डोंबिवलीत दाखल झाले आणि पाटकर रस्ता, रॉथ रस्ता, उर्सेकरवाडी, रामनगर प्रभागात फेरीवाले दुपटीने वाढल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामुळे शनिवारी झालेल्या चर्चेदरम्यान भंडारी हे नगरसेवक, कर्मचाऱ्यांच्या टीकेचे लक्ष्य झाले होते. कर्मचाऱ्यांनी राजकीय किंवा अन्य कोणताही दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
कर्मचाऱ्यांची कमतरता
पालिकेतील सुमारे १९०० सफाई कामगार आहेत. त्यापैकी फेरीवाला हटाव पथकात २२२ सफाई कामगार अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. सुमारे २०० ते ३०० कामगार व्याधी, आजारामुळे प्रदीर्घ रजेवर असतात. काही शिपाई म्हणून अधिकारी, पदाधिकारी यांच्या दालनात सेवा देतात. त्यामुळे १५ लाख लोकसंख्येकडून शहरात दररोज तयार होणार कचरा उचलण्यासाठी प्रशासनाकडे फक्त १००० ते १२०० कामगार उपलब्ध राहतात. नगरसेवक नीलेश शिंदे यांनी ही आकडेवारी यापूर्वीच्या महासभेत उघड केली होती. आयुक्तांनीही पालिकेच्या सात प्रभागांपैकी फक्त चार प्रभाग नियमित स्वच्छ करतील एवढेच सफाई कामगार प्रशासनाकडे आहेत, अशी कबुली गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण सभेत दिली होती. बहुतांशी सफाई कामगार घाणीत हात घालण्यापेक्षा नीटनेटके राहता येईल अशा फेरीवाला हटाव पथकात सोय लावून घेतात, त्यामुळे शहरात कचऱ्याची समस्या कायम असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.