शाळेतील मुलांचा गुणवत्तापूर्ण विकास आणि शाळेत भौतिक सुविधा देण्यात आघाडी घेऊन, शिक्षक, विद्यार्थी आणि लोकसहभागातून शाळेचा सर्वागीण विकास मुरबाड तालुक्यातील (जि. ठाणे) बुरसुंगे प्राथमिक शाळेने केला आहे. शाळेच्या या गुणवत्तापूर्ण कार्याची दखल पुणे येथील गुणनियंत्रण विभागाने घेतली आणि शाळेला ‘आयएसओ’(९००१-२०१५) दर्जा बहाल केला आहे. सोमवारी या दर्जाची घोषणा करण्यात आली. अशा प्रकारचा दर्जा मिळणारी ठाणे जिल्हा परिषदेची ही पहिलीच ‘आयएसओ’ शाळा आहे.
बुरसुंगे शाळेतील विविध शैक्षणिक व अन्य सुविधांची तपासणी करण्यासाठी पुणे येथून ‘आयएसओ’ दर्जा देणाऱ्या पाहणी पथकाने भेट दिली. दर्जासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यात आल्यामुळे बुरसुंगे शाळेला आयएसओ दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागात ठाणे जिल्हा परिषदेची बुरसुंगे प्राथमिक शाळा आहे. शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेत एकूण ३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण मिळावे. त्या माध्यमातून त्यांना अभ्यासक्रमातील धडे देता यावेत म्हणून यापूर्वीच शाळा डिजिटल (संगणक तंत्रज्ञान) करण्यात आली आहे. शहरी भागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत अत्याधुनिक सुविधा मिळतात, तशाच सुविधा ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या मुलांना मिळाल्या पाहिजेत. हा विचार करून बुरसुंगे शाळेचे शिक्षक महेंद्र सुपेकर यांनी शाळेला ‘आयएसओ’ दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले. ‘आयएसओ’च्या गुणवत्ता प्रमाणकानुसार शाळेत शैक्षणिक, भौतिक, सुशोभीकरणाच्या सुविधा निर्माण करणे आवश्यक होते. हा विषय खर्चिक असल्याने सुपेकर यांनी हा विषय काही महिने गुंडाळून ठेवला. पण शाळा ‘आयएसओ’ करण्याचा निर्धार असल्याने, त्यांनी हा विषय केंद्रप्रमुख गोपाळ सोनावळे यांना सांगितला. सोनावळे यांनी शाळा, शिक्षक पुढाकार घेणार असेल तर, आपण शाळेत सुविधा देण्यासाठी काही खर्चाची तजवीज करू, अशी तयारी दर्शविली. त्यामुळे शाळेतील आर्थिक प्रश्न सुटला.
उपलब्ध निधीतून गुणनियंत्रण संस्थेने केलेल्या सूचनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले. शाळेतील खिडक्यांना पडदे लावण्यात आले. अन्य प्रकल्प राबविण्यात आले. गेल्या चार महिन्यापासून नव्या जोमाने शिक्षक महेंद्र सुपेकर, शिक्षिका प्रणाली काळे, केंद्रप्रमुख गोपाळ सोनावळे, विद्यार्थी, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी कामाला लागले. ‘आयएसओ’ दर्जा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करण्यात आली.
शाळेने ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त करण्यासाठी केलेल्या सुविधांची पाहणी करण्यासाठी पुणे येथून एक पथक बुरसुंगे शाळेत आले होते. या पाहणी पथकाने शाळेने केलेल्या कार्याची पाहणी करून शाळेला आयएसओ दर्जा देत असल्याचे जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राप्त पुरस्कार
स्वच्छ सुंदर शाळा
डिजीटील शाळा
विज्ञानशाळेचा पुरस्कार
सौर उर्जेचा पुरस्कार

शाळेतील क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, स्वच्छता या विषयाची गोडी लागावी म्हणून बुरसुंगे शाळेत अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण विभागाचे अधिकारी यांचे सहकार्य या उपक्रमांना मिळत आहे. या माध्यमातून शाळेला पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याच सगळ्या यशात ‘आयएसओ’ दर्जा मिळाल्यामुळे शाळेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
– महेंद्र सुपेकर, शिक्षक, बुरसुंगे

शाळेतील सुधारणा
शाळेला रंगरंगोटी करुन आकर्षक केली.
शाळेच्या आवारात मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
शाळेच्या आवारात तयार होणारा कचरा एकत्रीत करुन त्यापासून गांडुळखत प्रकल्प
पाणी बचतीसाठी शाळेच्या आवारातील झाडांना नैसर्गिक साधनांचा वापर करुन, ठिंबक सिंचन पध्दतीने पाणी
शाळेतील प्रत्येक नस्तीला (फाईल्स) विशीष्ट क्रमांक देऊन, त्याची कपाटात मांडणी
ग्रंथालय, वाचनकक्ष, संगणक कक्ष
सौरउर्जा सयंत्राचा नियमित वापर. शाळेतील वीजेवरील सुविधा इनव्‍‌र्हटरला जोडलेली
वर्ग खोल्यांमध्ये अभ्यासक्रमानुसार तक्ते. माहितीपट
प्रत्येक वर्ग खोलीत कचरा पेटी
शाळेच्या आवारात स्वयंशिस्त म्हणून विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची कामे
शाळेत रक्तदान शिबीर, बुरसुंगे फेस्टिव्हल भरवून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
शाळेने केलेल्या शैक्षणिक, सुविधांच्या प्रगतीमुळे गुणांकात वाढ
शाळेच्या आवारात सायकली, अन्य वाहने ठेवण्यासाठी वाहनतळ
बुरसुंगे गावात प्रचारफेरी काढून गावात स्वच्छता ठेवणे, पाणी बचत करण्याचे संदेश दिले
अनावश्यक खर्चावर बंदी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zp school get iso status
First published on: 03-02-2016 at 00:04 IST