दिवा

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा शहरातील विविध प्रकल्पांच्या माध्यमातून महापालिका एकीकडे स्मार्ट शहराकडे वाटचाल करत असल्याचा दावा करत असली तरी दिवा आणि परिसराचा बकालपणा मात्र अद्यापही कायम आहे. ठाणे शहराचा विकासाचा चेहरा घेऊन वावरणारे आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिव्याच्या विकासासाठी ठोस असे काही करता आलेले नाही, असा आरोप आता दिवावासीय करू लागले आहेत. या भागात घोडबंदरच्या धर्तीवर विकासाचे नवे केंद्र विकसित करण्याचा महापालिकेचा मानस असल्याने नव्या रस्त्यांची आखणी केली जात आहे. तब्बल १०० कोटी रुपयांच्या रस्त्यांचे प्रकल्प या भागात आखण्यात आले असले तरी मागील पाच वर्षांत मात्र दिव्याच्या पदरात फारसे काही पडलेले नाही. त्यामुळे कधी तरी विकास होणार या आशेवर येथील रहिवाशी आहेत.

Chandrapur, Woman died, tiger attack,
चंद्रपूर : वाघाने घेतला महिलेचा घास, तेंदूपत्ता गोळा करत असताना…
baobab tree, angry environmentalists,
३०० वर्ष जुन्या बाओबाब झाडाची कत्तल, संतप्त पर्यावरणप्रेमी उद्या शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार
elephant himself panted and gave water to the mahout video goes viral
मस्तच! हत्तीने स्वत: हापशी हापसून माहूताला पाजले पाणी… व्हिडीओ एकदा बघाच…
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’

दिव्यात आगासन, म्हातार्डी, दातिवली, बेतवडे, पडले, डावले, डायघर आणि खर्डी असे परिसर येतात. एकेकाळी खेडेगाव म्हणून परिचित असलेल्या या भागात एक बेकायदा नगर उभे राहिले आहे. एव्हाना दिव्याची लोकसंख्या चार लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्या तुलनेत परिसरात पायाभूत समस्यांचा अभाव दिसून येतो. पाणी, वाहतूक, रस्ते अशी मूलभूत सुविधांच्या समस्यांना या भागाला ग्रासले आहे. महापालिकेच्या अन्य क्षेत्राच्या तुलनेत सुविधांच्या बाबतीत दिवा सर्वच आघाडय़ांवर उपेक्षित राहिले आहे. ठाणे महापालिकेची स्वत:च्या मालकीची कचराभूमी नसल्याने दिव्यातील खासगी जागांवर पालिका क्षेत्रातील कचरा टाकला जातो. या कचऱ्यामुळे दिवावासीयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून यंदाच्या निवडणुकीत हाच प्रचाराच्या कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्याचप्रमाणे दिवा शिळ, दिवा आगासन, साबे रोड हे दिव्यातील प्रमुख रस्ते आहेत, पण त्यांचीही दुरवस्था झाल्याचे दिसून येते.

वाहतूक कोंडी

दिवा स्थानकातून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा मोठा असून या भागात ऐन सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. अरुंद रस्ते आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे या भागात वाहतूक कोंडी होत आहे. ती सोडविण्यासाठी गेल्या काही वर्षांत पालिकेकडून ठोस पावले उचलण्यात आली नसल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. दिव्यात बेकायदा रिक्षांची संख्या मोठी आहे.

रेल्वे स्थानकाची समस्या

रेल्वेवर प्रवाशांचा भार वाढला आहे. दिव्यात यापूर्वी धिम्या गतीच्या लोकल गाडय़ांनाच थांबा होता; मात्र प्रवाशांच्या आंदोलन आणि मागणीनंतर स्थानकात आता जलद गाडय़ांना थांबा देण्यात आला आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांना येथे थांबा देण्यात आला असून त्यामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे  प्रवाशांना जलद गाडय़ांमधून प्रवास करणे शक्य होत नसून त्यांची वाहतुकीची मूळ समस्या कायम आहे.

पाणी समस्या आणि चोरीही..

दिव्यातील दातिवली, मुंब्रा देवी कॉलनी, बेतवडे गाव, धर्मवीरनगर, म्हातार्डी या परिसरांतील पाणी समस्या गंभीर आहे. या भागातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. या भागात त्यासाठी टँकरमाफियांचे मोठे जाळे पसरले आहे. इमारती तसेच चाळींना पाणीपुरवठा करणाऱ्या छोटय़ा जलवाहिन्या भूमिगत नाहीत. जलवाहिन्यांना छिद्रे पाडून पाणीचोरी केली जाते.

कोकणवासीय, उत्तर भारतीय

दिवा परिसरात कोकणवासीय मतदार आहेत. दिवा स्थानक परिसर, साबे, सद्गुरूनगर, बी. आर. नगर, बेडेकर नगर, भोलेनाथ नगर, दातिवली, बेतवडे या परिसरात कोकणवासीयांची संख्या जास्त आहे. तर मुंब्रा देवी कॉलनी, बेडेकर नगर, बी. आर. नगर, आगासन, दिवा शिळ, देसाई, खिडकाळी या परिसरात उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे. त्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक, आगरी समाजाचे लोक आणि बंगाली लोकांची वस्तीही येथे मोठय़ा प्रमाणात आहे.

प्रभाग क्रमांक २७

अ- नागरिकांचा मागासवर्ग-प्रवर्ग

ब- सर्वसाधारण महिला

क- सर्वसाधारण महिला

ड- सर्वसाधारण

एकूण लोकसंख्या- ५२,०४७

प्रभाग क्षेत्र- दिवा, साबे, सद्गुरू नगर, बी. आर. नगर

 

प्रभाग क्रमांक २८

अ- अनुसूचित जाती

ब- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला

क- सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

एकूण लोकसंख्या- ५५,६६६

प्रभाग क्षेत्र- आगासन, म्हातार्डी, बेतवडे, दातिवली, भोलेनाथ नगर, बेडेकर नगर

प्रभाग क्रमांक २९

अ- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

ब- सर्वसाधारण महिला

क- सर्वसाधारण महिला

एकूण लोकसंख्या- ४५,९८३

प्रभाग क्षेत्र- खर्डी, डावले, पडले, देसाई, खिडकाळी, डायघर, कौसा तलाव

दिवा भागात पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाण्याच्या दोन मोठय़ा टाक्या बांधण्यात आल्या आहेत, परंतु त्यात पाणी चढविण्याची सोयच नसल्याने त्या टाक्या तशाच पडून आहेत.

प्रथमेश नलावडे, दिवा.

कचराभूमीचा प्रश्न हा आजही अधांतरी आहे. निवडणुकीनंतर कचराभूमीचा प्रश्न थंडावेल. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. दिवा हे समस्यांचे माहेरघर आहे, परंतु ही ओळख पुसायला हवी.

सोनाली निकम, दिवा

दिव्यातील रस्त्यांवर खड्डेच आहेत. सांडपाण्याची समस्या कायम आहे. शाळकरी मुले, प्रवासी त्यातूनच प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्नही येथे उद्भवतो आहे.

तुषार मवाळ, दिवा

दिव्यात पालिकेचे रुग्णालय हवे. खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नाही. कळवा वा ठाणे जिल्हा रुग्णालयात जावे लागते. अनेकदा तेथे जाईपर्यंत रुग्ण दगावतो.

प्रथमेश दळवी, दिवा