डिजिटल शाळेला प्रारंभ होणार

मराठी शाळांच्या भवितव्याची चर्चा सर्वत्र सुरू असताना कल्याण येथील जिल्हा परिषदेची गुरवली शाळा शंभर वर्षे आपले स्थान टिकवून आहे. येत्या ३ जानेवारी रोजी या शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत असून स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळा गुरवली परिसरात आपल्या अस्तित्वाने इतिहासाची साक्ष देत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या दिवशी गुरवली ग्रामस्थ शाळेचा शतकोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

टिटवाळा शहरापासून काही अंतरावर असलेल्या गुरवली या गावात स्वातंत्र्यपूर्व काळात ३ जानेवारी १९१६ रोजी प्राथमिक शिक्षणासाठी स्कूल बोर्डाची शाळा सुरू करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाला फार महत्त्व दिले जात नसल्याने प्रारंभी या शाळेला विरोध झाला. मात्र टिटवाळ्यातील तत्कालीन सुशिक्षित तरुणांनी ही स्कूल बोर्डाची शाळा बिकट परिस्थितीत सुरू ठेवून भावी पिढीला शिक्षण देण्याचे काम सुरू ठेवले. स्कूल बोर्डाची शाळा जिल्हा परिषदेच्या निर्मितीनंतर जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात आली होती. सुरुवातीला पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण असणाऱ्या या शाळेत सध्या विद्यार्थ्यांना ७वीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. शंभर वर्षे शिक्षणाची अखंड सेवा करून गुरवली शाळेने अनेक पिढय़ा साक्षर केल्या आहेत. या शाळेतील विद्यार्थी आज उद्योग, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळातील ही शाळा बदलत्या काळानुसार नवीन बदल स्वीकारल्यामुळे शंभर वर्षे कार्यरत आहे. इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव, खासगी तसेच डिजिटल शाळांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शतकोत्सवाच्या दिवशी या शाळेत विद्यार्थ्यांसाठी डिजिटल वर्ग खुले होणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळेच्या शतकपूर्तीनिमित्त लोकसहभागातून आधुनिकतेची कास धरत शाळा डिजीटल होत आहे. याचा उपयोग शाळेतील विद्यार्थ्यांना होणार आहे, असे मुख्याध्यापिका महानंदा साळी यांनी सांगितले.